Happy New Year म्हणण्यावरुन वाद; चौघांनी एकावर कुऱ्हाडीने वार करत तोडला हात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 04:11 PM2023-01-01T16:11:37+5:302023-01-01T16:11:47+5:30
हॉस्पिटल सुरु होण्यापूर्वी केलेल्या डॉक्टरांच्या मदतीने तरुणाचा हात वाचला
पुणे : दारुच्या नशेत येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना हॅपी न्यू इयर म्हणण्यावरुन झालेल्या वादात चौघांनी एका तरुणावर कुर्हाडीने वार करुन मनगटापासून हात तोडला. रक्ताळलेला हात घेऊन पोलिसांनी तातडीने या तरुणाला शेजारच्या उघड्या असलेल्या दवाखान्यात नेले. उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या या दवाखान्यामधील डॉक्टरांनी प्रसंगावधान दाखवून प्राथमिक उपचार करुन त्याला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पाठविले. तेथे या तरुणाच्या हातावर शस्त्रक्रिया करुन हात पुन्हा जोडण्यात डॉक्टरांना यश आले.
पंकज तांबोळी असे या तरुणाचे नाव आहे. तांबोळी हे सीडॅक ए सी टी एस या इन्सिट्युटमध्ये डॅक कोर्स करीत आहेत. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून त्यातील तिघे अल्पवयीन आहेत. हा प्रकार साई चौकात पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत आशुतोष अर्जुन माने (वय २४, रा. दुर्वांकूर, पंचवटी, पाषाण) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र पंकज तांबोळी, साजीद शेख हे मेस बंद असल्याने साई चौकातील ईर्षाद हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. जेवण झाल्यावर पहाटे ते हॉटेलबाहेर उभे असताना मोटारसायकलवरुन दोघे जण आले. ते दारुच्या नशेत सर्वांना जबरदस्तीने हॅपी न्यू इयर म्हणत होते. त्यावरुन त्यांच्यात काही वाद झाला. तेव्हा त्यांच्यातील एकाने आपल्या साथीदारांना बोलावून घेतले. त्याचे साथीदार आल्यावर पुन्हा वाद झाला. तेव्हा धक्काबुक्कीत एकाने पंकज यांच्या हातावर कुर्हाडीने वार केला. त्यात पंकज याचा मनगटापासून हात तुटला. पंकजचा तुटलेला हात आणि रक्त पाहून ही मुले घाबरुन पळून गेली.
डॉक्टरांचे प्रसंगावधान
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले की, या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहचले. त्यांनी या तरुणाला जवळच उघडे असलेल्या दवाखान्यात नेले. या दवाखान्याचे येत्या दोन दिवसात उद्घाटन होणार आहे. तरी डॉ. अवधूत यांनी ते उघडे ठेवले होते. त्यांनी पंकजचा रक्ताळलेला व तुटलेला हात घेऊन तो स्वच्छ करुन एका प्लॉस्टिकच्या पिशवीत टाकून त्याला तातडीने ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पाठविले. तेथील डाॅक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करुन तो पूर्ववत जोडला आहे. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून गौरव गौतम मानवतकर(वय २०, रा. रा. तोंडे चाळ, सुतारवाडी पाषाण) याला अटक केली आहे.