Pimpri Chinchwad: डोसा खाताना चटणी पडल्यावरून वाद; ग्राहकांकडून व्यावसायिकाला बेदम मारहाण
By नारायण बडगुजर | Published: July 22, 2023 02:08 PM2023-07-22T14:08:20+5:302023-07-22T14:09:39+5:30
ग्राहकांनी डोसा सेंटरवाल्याला बेदम मारहाण केली...
पिंपरी : डोसा सेंटरवर दोन ग्राहक डोसा खात होते. त्यावेळी चटणी तव्यावर पडली. त्याबाबत बोलल्याने दोन्ही ग्राहकांनी डोसा सेंटरवाल्याला बेदम मारहाण केली. तसेच मोबाइल व दुकानाच्या गल्ल्यातील एक हजार १०० रुपये जबरदस्तीने घेतले. याप्रकणी पोलिसांनी एकाला अटक केली. संत तुकाराम नगर, पिंपरी येथे शुक्रवारी (दि. २१) सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार घडला.
विजय जगन्नाथ यादव (वय ३५, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. निक्की उर्फ दिलीप चौहाण (वय २८, रा. नेहरुनगर, पिंपरी) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्यासह त्याच्या जाफर नावाच्या साथीदाराच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे आदेश डोसा सेंटर नावाचे दुकान आहे. आरोपी शुक्रवारी फिर्यादीच्या दुकानात डोसा खाण्यासाठी आले. त्यावेळी निक्की चौहाण याचा साथीदार असलेल्या जाफर याने डोसाची प्लेट तव्यावर ठेवून त्यावर चटणी टाकत असताना चटणी तव्यावर पडली. त्याबाबत फिर्यादी त्याला म्हणाले, तुला चटणी पाहिजे असेल तर मी आणून देतो. तू तव्यावर प्लेट ठेवू नको. फिर्यादीच्या या बालेण्याचा आरोपींना रागा आला. आरोपींनी शिवीगाळ करून फिर्यादीला लाकडी दांडक्याने व लाकडी बॅटने मारहाण करून उजव्या हाताला जखमी केले. तसेच फिर्यादी सोबतचा कामगाराच्या खिशातील १० हजार रुपये किमतीचा मोबाइल जबरदस्तीने काढून घेतला. तसेच दुकानाच्या गल्ल्यातून एक हजार १०० रुपये, असा एकूण ११ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन आरोपी पळून गेले. याप्रकरणी फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. गुन्हा दाखल करून पोलिसांनी निक्की उर्फ दिलीप चौहाण याला अटक केली. पोलिस उपनिरीक्षक अशोक कोकाटे तपास करीत आहेत.