लोकप्रतिनिधींमध्ये लसीकरणावरून असलेला वाद नागरिकांच्या जिवाशी, नागरिकांना पायपीट, भरउन्हात उभे राहण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:10 AM2021-05-09T04:10:25+5:302021-05-09T04:10:25+5:30
वाघोली येथील बी.जे.एस. हायस्कूल येथील चार महिन्यांपासून सुरू असलेल्या सुमारे 17 हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे येथे लसीकरण झाले असून ...
वाघोली येथील बी.जे.एस. हायस्कूल येथील चार महिन्यांपासून सुरू असलेल्या सुमारे 17 हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे येथे लसीकरण झाले असून वेटिंगसाठी भरपूर जागा, लसीकरणाची वेगळी खोली, लसीकरणानंतर ऑब्झर्वेशनसाठी स्वतंत्र हॉल, डॉक्टर व स्टाफसाठी स्वतंत्र रूम, साहित्यासाठी स्वतंत्र रूम, पार्किंगसाठी भरपूर जागा अशी सुविधा असतानाही हे केंद्र केवळ लोकप्रतिनिधीच्या वादातून हलविण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी सोसायटीमध्ये लसीकरण केल्याच्या प्रकारणानंतर हा वाद सुरू झाला. या वादातूनच केंद्र हलविण्याचा प्रकार झाला. आपण नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचे भानही लोकप्रतिनिधींना राहिले नाही. लोकप्रतिनिधींच्या या वादाला अधिकारीही बळी पडत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज हजारो रुग्ण तपासणी आणि उपचासाठी येत असून लसीकरण केंद्र येथे हलविल्यामुळे गर्दीत वाढ झाली असून. शिवाय, रुग्ण व लसीकरणासाठी आलेले नागरिक यांच्यात संपर्क येत आहे. यामुळे पॉझिटिव्हीटी वाढण्याची शक्यता आहे
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाउसमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे दोन खोल्या आहेत. लसीकरण स्टाफला बसण्यासाठीही पुरेशी जागा नाही. लसीकरणानंतर नागरिकांना ऑब्झर्वेशनसाठी बसण्याचीही जागा नाही. गेस्ट हाऊस समोर वेटिंग करण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. याच जागेत छोटा मांडव टाकण्यात आला आहे. यामुळे काही नागरिक भर उन्हात उभे होते. बसण्यासाठी पुरेशी जागाही नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात चारचाकी येण्यासाठी पुरेसा रस्ताही नाही. यामुळे वृद्ध व्यक्तीला महामार्गावरून तेथून चालत आणण्याची कसरत करावी लागत आहे. पार्किंगसाठी जागा नसल्याने भर पुणे-नगर महामार्गावर वाहने पार्किंग करण्यात आली आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होणार आहे.
आयसीएमआरच्या नियमानुसार ज्या जागेत केंद्राची मान्यता आहे, त्याच जागेत सेंटर सुरू ठेवता येते. वाघोलीचे केंद्राचे ठिकाण प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने ते तेथे हलविले. बी. जे. एस. येथे सुरू करण्यात आलेले केंद्र मान्यतेचे नव्हते. असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. स्थानिक लोकप्रतिनिधींनी पत्र दिल्यास तेथेही मान्यता घेऊन स्वतंत्र केंद्र सुरू करता येईल, असे ही ते म्हणाले