विरोधकांनी राफेल करारावरुन उठवलेला वादंग म्हणजे निवडणुकीचा प्रपोगंडाच : डॉ. सुभाष भामरे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 02:56 PM2018-10-04T14:56:00+5:302018-10-04T15:02:07+5:30
राफेल करार हा युपीएच्या काळात पूर्ण झालेला नाही. तसेच त्यावेळी राफेल विमानाची किंमत सुध्दा ठरलेली नव्हती. तरीही विरोधक राफेलची किंमत सांगत आहेत.
पुणे: राफेल करार हा युपीएच्या काळात पूर्ण झालेला नाही. तसेच त्यावेळी राफेल विमानाची किंमत सुध्दा ठरलेली नव्हती. तरीही विरोधक राफेलची किंमत सांगत आहेत. त्यामुळे राफेल करारावरुन विरोधकांनी उठवलेला वादंग म्हणजे हा आगामी निवडणुकीचा प्रपोगंडा आहे, असे मत संरक्षण राज्य मंत्री डॉ सुभाष भामरे यांनी व्यक्त केले.
एल अँड टी आणि इंडियन नॅशनल अकॅडमी आॅफ इंजेनिअरिंग द्वारे आयोजित इंजिनिअरींग काँकलेव्ह २०१८ या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन भामरे यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रम झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भामरे म्हणाले, युपीए सरकारने ठरवलेल्या किंमतीपेक्षा आम्ही केलेल्या करारात राफेलची किंमत जवळपास ९% कमी आहे. भारतीय हवाई दलाला ४२ स्क्वार्डनची गरज आहे. सध्या ३३ स्क्वार्डन कार्यरत असून,येत्या काळात मिग विमाने कार्यमुक्त झाल्यावर ही संख्या आणखी कमी होणार आहे. यामुळे भारतीय हवाईदलाची ताकद वाढवण्यासाठी राफेलची गरज आहे. त्यासाठीे ३६ विमाने २०१९ पर्यंत भारताला मिळणे अपेक्षित आहे. भारतीय बनावटीच्या १२६ तेजस या हलक्या लढाऊ विमानाची निर्मिती करण्याची एचएएल ला आॅर्डर देण्यात आली आहे. त्यामाध्यमातून ४२ स्क्वार्डनची गरज भागविण्यात येणार आहे. एचएएल ला डावलून रिलायन्स ला राफेल चे काम दिल्याच्या आरोपीला उत्तर देताना भामरे म्हणाले की एचएएल ला डावलण्याचा प्रश्न येत नाही. सध्या एचयेयेलकडे सुखोई, तेजस बनविण्याचे कंत्राट मिळाले आहे. जवळपास १ लाख करोड रुपयांची कामे एचएएलमध्ये सुरु आहे. यामुळे ते व्यस्त आहे. असे प्रतिपादन संरक्षण राज्य मंत्री डॉ. भामरे यांनी केले.