संघटन वाढीसाठी वैचारिक बैठक पक्की करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:11 AM2021-04-07T04:11:35+5:302021-04-07T04:11:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन साजरा होत असताना, भविष्याच्या दृष्टिकोनातून पक्षातील नव्या कार्यकर्त्यांची वैचारिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन साजरा होत असताना, भविष्याच्या दृष्टिकोनातून पक्षातील नव्या कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक पक्की होणे गरजेचे आहे. त्यासाठी अभ्यास वर्गाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जावेत, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पक्षाच्या ४१ व्या स्थापना दिनानिमित्त, शहर भाजपा कार्यालयात आयोजित व्हर्चुअल रॅलीला उद्देशून पाटील बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, आगामी काळात भाजपविरुद्ध इतर पक्ष असाच राजकीय आणि वैचारिक संघर्ष होणार आहे. छत्तीसगडमधील घटना अतिशय वेदनादायी आहे. देशभरात एक सुप्त संघर्ष सुरू आहे. हे सुप्त संघर्ष निर्माण करणारे ‘स्लीपर सेल’ अतिशय शांतपणे आपल्या विरोधात संघर्ष करत आहेत. आगामी काळात जो वैचारिक संघर्ष होईल, तो प्रामुख्याने आपण विरुद्ध इतर असाच होणार आहे.
सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आपण स्वबळावर लढून आपल्याला १२२ जागा मिळाल्या. या निवडणुकीत आपल्याला १ कोटी ४७ लाख मते मिळाली. सन २०१९ च्या निवडणुकीत शंभर जागा कमी लढूनही आपल्याला १ कोटी ४२ लाख मते मिळाली. त्यामुळे सन २०२४ च्या निवडणुकीत आपण स्वबळावर निवडणूक लढवून, २ कोटी पेक्षा जास्त मते मिळवायची आहेत. यासाठी बूथ रचना अतिशय सक्षम झाली पाहिजे, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली़
खासदार बापट यांनी, भारतीय जनता पक्ष हा कोणी एका व्यक्तीने स्थापन केलेला नाही. त्यामुळे कुठल्याच एखाद्या कुटुंबाची यावर मालकी राहिलेली नसून हा पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष आहे. आपल्या नेत्यांनी देखील आपल्या कामामधून आदर्श सर्वांसमोर ठेवला. कार्यकर्ता हा या पक्षाचा प्राण आहे. गणेश घोष यांनी सूत्रसंचालन केले.
--------------------------------
फोटो मेल केला आहे़