मतदारांसाठी आलिशान गाड्यांची सोय
By Admin | Published: August 5, 2015 03:30 AM2015-08-05T03:30:22+5:302015-08-05T03:30:22+5:30
तालुक्यात काही किरकोळ प्रकार वगळता ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले. आज झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत दुपारी साडेतीनपर्यंत ७२.६२ टक्के
इंदापूर : तालुक्यात काही किरकोळ प्रकार वगळता ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले. आज झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत दुपारी साडेतीनपर्यंत ७२.६२ टक्के मतदान झाले. एकूण १ लाख २९ हजार ५६४ मतदारांपैकी ९४ हजार ९० मतदारांनी मतदान केले. मतदार यादीतील चुकांमुळे वरकुटे खुर्द, लोणी देवकरच्या मतदान केंद्रांवर दोन गटात वाद झाले. मतदारांना मतदानासाठी आलिशान गाड्यांची सोय करण्यात आली होती.
सर्वाधिक मतदान बळपुडी ग्रामपंचायतीसाठी (९५.२० टक्के), तर सर्वात कमी मतदान वालचंदनगर (४५.७४ टक्के) ग्रामपंचायतीसाठी झाले. मतदार यादीतील नावांच्या चुकांमुळे वरकुटे खुर्द व लोणी-देवकर ग्रामपंचायतीच्या मतदान केंद्रांच्या परिसरात दोन गटात वादावादी झाली. मात्र वृत्त लिहिपर्यंत गुन्हे दाखल झाले नव्हते.
आज सकाळी साडेसात वाजता गावनिहाय मतदान केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली. साडेनऊ वाजेपर्यंत मतदान वेगाने झाले. दुपारी एकनंतर संथगतीने मतदान झाले. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी गावातील निवडणूक लढवणाऱ्या दोन गटात चांगलीच ‘टस्सल’ असल्याचे चित्र होते. एरवी एसटी बस ही नशिबात नसणाऱ्यांच्या दिमतीला आलिशान चारचाकी गाड्या होत्या, त्याही मोफत. गलांडवाडी नंबर २ सारख्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील उमेदवारांनी सामिष व शाकाहारी भोजनाची सोय केली होती. या निवडणुकीत लोणी-देवकर, वालचंदनगर, निमगाव केतकी, अंथुर्णे, कळस, कळंब, सणसर, लासुर्णे, निमसाखर या लोकसंख्या व राजकीय भवितव्य ठरवणाऱ्या ग्रामपंचायतींचे सत्ताधीश ठरणार आहेत.
(वार्ताहर)