देशातील महापालिका कामगारांचे पुण्यात अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 08:32 PM2018-08-22T20:32:18+5:302018-08-22T20:40:52+5:30
कंत्राटी पद्धतीने कामगारांना कामावर घेण्याच्या धोरणास देशस्तरावर विरोध करण्यात येणार असून त्याची रूपरेषा या अधिवेशनात ठरवण्यात येणार आहे.
पुणे : आॅल इंडिया म्युन्सिपल वर्कस फेडरेशन चे अखिल भारतीय स्तरावरील दुसरे खुले अधिवेशन पुण्यात होत आहे. पुणे महापालिका कामगार युनियनने या अधिवेशनाचे आयोजन केले आहे. केंद्र व राज्य सरकारांच्या कामगार विरोधी धोरणांना, विशेषत: स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कंत्राटी पद्धतीने कामगारांना कामावर घेण्याच्या धोरणास देशस्तरावर विरोध करण्यात येणार असून त्याची रूपरेषा या अधिवेशनात ठरवण्यात येणार आहे.
आॅगस्ट २५ ते २७ दरम्यान रोज सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत शिवाजी नगर येथील श्रमिक भवन येथे हे अधिवेशन होणार आहे. गेल्या काही वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कायम कामगार ही संकल्पनाच संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याऐवजी कंत्राटी पद्धतीने कामगारांची भरती करण्यात येत आहे. कंत्राटी पद्धतीमध्ये कामगारांना कसलाही हक्क राहत नाही, रजा, आरोग्य सुविधा अशा न्याय सवलती मिळत नाहीत. या धोरणाच्या विरोधात अधिवेशनात चर्चा करून भुमिका ठरवण्यात येणार असल्याची माहिती पुण्यातील संयोजकांनी दिली.
तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश व अन्य राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामगार संघटनांचे प्रतिनिधी अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी राजीव डिमरी, मिलिंद रानडे ,बाळासाहेब सुरूडे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पुणे युनियनचे सरचिटणीस वैजनाथ गायकवाड यांनी दिली.