पीएमपीच्या दीडशे कर्मचा-यांवर संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 04:53 AM2018-01-16T04:53:07+5:302018-01-16T04:53:28+5:30
गैरहजेरीच्या कारणावरून दोन दिवसांपूर्वी पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) १५८ चालकांना घरचा रस्ता दाखविल्यानंतर आता दीडशेहून अधिक वाहकांची गच्छंती होण्याची शक्यता आहे.
पुणे : गैरहजेरीच्या कारणावरून दोन दिवसांपूर्वी पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) १५८ चालकांना घरचा रस्ता दाखविल्यानंतर आता दीडशेहून अधिक वाहकांची गच्छंती होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे वाहकही बदली हंगामी रोजंदारीवर काम करीत असून त्यांची चौकशी पूर्ण झाली आहे. लवकरच त्यांच्याही सेवा समाप्तीचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
‘पीएमपी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बेशिस्त कर्मचाºयांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी वरिष्ठ अधिकाºयांसह सर्व कर्मचाºयांवर कारवाई केली आहे. दंडात्मक कारवाईसह निलंबन बडतर्फीही केली. मात्र, शनिवारी एकाचवेळी तब्बल १५८ चालकांचे काम थांबविण्यात आले.
आॅगस्ट ते डिसेंबर या कालावधीत अपेक्षित हजेरी न भरल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे ‘पीएमपी’ प्रशासनाकडून सांगण्यात आले. आता याच कारणावरून आठवडाभरात दीडशेहून वाहकांना घरी जावे लागणार आहे.