खडतर प्रशिक्षणानंतर एनडीएच्या १४७ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ उत्साहात

By नितीश गोवंडे | Published: November 30, 2024 01:23 PM2024-11-30T13:23:52+5:302024-11-30T13:27:07+5:30

संचलनाला चेतक हेलिकॉप्टर, सुखोई यासह पी८आय पोसायडन या लढाऊ विमानाने पहिल्यांदाच दिलेली सलामी हे विशेष आकर्षण ठरले.

Convocation ceremony of 147th batch of NDA after tough training | खडतर प्रशिक्षणानंतर एनडीएच्या १४७ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ उत्साहात

खडतर प्रशिक्षणानंतर एनडीएच्या १४७ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ उत्साहात

पुणे : डोळ्यात देशसेवेची स्वप्न घेऊन ‘एनडीए’त तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कॅडेट्सचा १४७ वा दीक्षांत समारंभ उत्साहात साजरा झाला. यावेळी संचलन सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात आले होते. या संचलनाला चेतक हेलिकॉप्टर, सुखोई यासह पी८आय पोसायडन या लढाऊ विमानाने पहिल्यांदाच दिलेली सलामी हे विशेष आकर्षण ठरले.

खडकवासला येथील एनडीएच्या खेत्रपाल मैदानावर गुलाबी थंडीत संचलनासाठी करण्यात आलेली जय्यत तयारी, सोबतीला लष्करी बँड पथकाच्या कदम कदम बढायेजा...सारे जहाँ से अच्छा... विजय भारत... या गाण्यांच्या तालावर दिलेली सलामी अशा दिमाखदार वातावरणात हा सोहळा शनिवारी (३० नोव्हेंबर) पार पडला.

पहाटेच्या रम्य वातावरणात बिगुल वाजल्यानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) ‘क्वाटर डेक’चा उघडलेला दरवाजा आणि या दरवाजातून विविध सुरावटींच्या तालावर संचलन करत खेत्रपाल मैदानावर लष्करी बँण्डचे झालेले आगमन, त्यापाठोपाठ प्रबोधिनीच्या छात्रांच्या मैदानावर झालेल्या प्रवेशामुळे उपस्थितांच्या अंगावर शहारा आला. एअर चिफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी सोहळ्याचा आढावा घेतला. तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी एअर व्हाईस मार्शल सरताज बेदी, एनडीएचे कमांडंट व्हाईस अ`डमिरल गुरुचरणसिंह, ले. जनरल धीरज सेठ यांची उपस्थिती होती.

तिन्ही वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणारा कॅडेट अंकित चौधरी हा यावर्षीचा राष्ट्रपती सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. कॅडेट युवराजसिंह चौहान हा राष्ट्रपती रौप्य पदकाचा मानकरी ठरला, तर कॅडेट जोधा थोंगजाउमायुम हा राष्ट्रपती कांस्य पदकाचा मानकरी ठरला.

कोणताही निर्णय घेताना आत्मविश्वासाने आणि निर्भीडपणे घ्या..

दीक्षांत समारंभावेळी एअर चिफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी कॅडेट्स ना उद्देशून बोलताना, कोर्स कॅडेट्स, पदक विजेते आणि चॅम्पियन स्क्वाड्रन यांचे कठोर परिश्रम आणि जबरदस्त कामगिरीबद्दल अभिनंदन केले. तरुण अधिकारी या नात्याने भविष्यातील कोणत्याही संघर्षात तुमची भूमिका महत्त्वाची असेल. शत्रूची रचना लक्षात घेऊन त्यांना पराभूत करणे आणि आपल्या महान राष्ट्राच्या अखंडतेशी तडजोड केली जाणार नाही, याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे.

यासंदर्भात देशामध्ये असणाऱ्या तीनही सेनांच्या प्रशिक्षण देणाऱ्या संस्था तुम्हाला येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम करण्यास मदत करतील. कोणताही निर्णय घेताना आत्मविश्वासाने आणि निर्भीडपणे घ्या. नेहमी तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेऊन एनडीए मध्ये शिकलेली प्रर्थना लक्षात ठेवा, ती तुम्हाला एक दिशादर्शकाचे काम करेल ज्यामुळे तुम्ही योग्य दिशेने सक्षमपणे पुढे जावू शकाल. एनडीएचे बोधवाक्य तुम्हाला हेच शिकवते की, फक्त स्वतःसाठीच नाही तर समाजासाठी तुमचे जीवन समर्पित असले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

Web Title: Convocation ceremony of 147th batch of NDA after tough training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.