‘पुरुषोत्तम’वर सीओईपीची मोहोर
By admin | Published: January 8, 2016 01:44 AM2016-01-08T01:44:40+5:302016-01-08T01:44:40+5:30
‘आव्वाज कोणाच्चा?’, ‘अभिनंदन!’, ‘आमच्याशिवाय आहेच कोण?’ अशा घोषणा... क्षणागणिक वाढत जाणारी उत्सुकता... डोळ्यांत प्राण आणून निकालाची वाट पाहणारे उदयोन्मुख कलाकार
पुणे : ‘आव्वाज कोणाच्चा?’, ‘अभिनंदन!’, ‘आमच्याशिवाय आहेच कोण?’ अशा घोषणा... क्षणागणिक वाढत जाणारी उत्सुकता... डोळ्यांत प्राण आणून निकालाची वाट पाहणारे उदयोन्मुख कलाकार... विद्यार्थ्यांचा अविरत जल्लोष... चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद, असे चित्र भरत नाट्य मंदिराच्या परिसरात पाहायला मिळाले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) ‘पेनकिलर’ या एकांकिकेने पुरुषोत्तम करंडकावर मोहोर उमटवली आणि जल्लोषाने जणू परिसीमाच गाठली.
महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे आयोजित ‘पुरुषोत्तम करंडक’ या आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धेच्या महाअंतिम फेरीमध्ये पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, जळगाव, नाशिक आणि मुंबई या ६ केंद्रांवर प्रथम आलेल्या २० एकांकिकांचे सादरीकरण झाले. त्यामध्ये सीओईपीच्या ‘पेनकिलर’ने बाजी मारली. महाअंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभात अभिनेता उपेंद्र लिमये, परीक्षक ज्योती सुभाष, डॉ. प्रवीण भोळे, प्रदीप वैद्य, सुहास जोशी हे मान्यवर उपस्थित होते.
या वेळी उपेंद्र लिमये म्हणाले, ‘‘कलेच्या क्षेत्रात सवंग, उथळपणा फोफावत असताना तरुणाईला उत्तम मार्गदर्शनाची गरज आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने कलाकार-परीक्षकांमध्ये संवाद घडला, मार्गदर्शन मिळाले तर कलाक्षेत्राला उत्तम कलावंत मिळतील. मी पुरुषोत्तमचे प्रॉडक्ट आहे, याचा मला अभिमान वाटतो. कलाकार म्हणून माझ्या घडण्याचे सगळे श्रेय मी पुरुषोत्तमलाच देतो. ते दिवस खूप जादुई, मंतरलेले होते. स्पर्धेसाठी मेहनत करण्याचे, जिंकण्याचे वेड लागले होते. पुरुषोत्तमसारखी स्पर्धा इतर कोणत्याही राज्यात नाही. आपल्याला १५० वर्षांची थिएटरची परंपरा
आहे. अनेक कलाकार या स्पर्धेने घडविले. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर मला पुरुषोत्तम करंडक मिळाल्यासारखे वाटले.
‘‘तरुणांना या स्पर्धेच्या निमित्ताने काही गुरुमंत्र मिळाल्यास त्यांना दोषांवर मात करून स्वत:ला घडवता येईल आणि दर्जा जपता येईल.’’
(प्रतिनिधी)