सीओईपीला दीडशे वर्षांची झळाळी
By admin | Published: August 5, 2015 03:04 AM2015-08-05T03:04:14+5:302015-08-05T03:04:14+5:30
पुणे शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग (सीओईपी)च्या एतिहासिक (हेरिटेज) इमारतीला बुधवारी (दि. ५) दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत
पुणे : पुणे शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग (सीओईपी)च्या एतिहासिक (हेरिटेज) इमारतीला बुधवारी (दि. ५) दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. सीओईपीतून शिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी स्वातंत्रपूर्व काळात मोलाचे कार्य केले असून, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक विद्यार्थ्यांनी देशाच्या विकासात भर घातली आहे.
भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या, डॉ.सी.के. पटेल, डॉ. विजय केळकर, सुहास पाटणकर, बी.जी. शेळके, एच.के. फिरोदिया, डॉ. माधवराव चितळे, पी.एस. देवधर, हरेश शहा, हरीश मेहता, लीला पुनावाला, रमेश रासकर, महादेव विनायक रानडे या सीओईपीच्या माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत योगदान देऊन देश विकासासाठी मोठा हातभार लावला.
दीडशे वर्षांपूर्वीचा वारसा असणाऱ्या सीओईपीच्या इमारतीचे डिझाईन डब्ल्यू.एस. हॉवर्ड यांनी केले तर इमारतीची पायाभरणी तत्कालीन गव्हर्नर बार्टले फ्रेरे यांनी ५ आॅगस्ट १८६५ रोजी केली. तब्बल साठ फूट उंच मनोरा असणारी देखणी इमारत आजही अनेकांचे लक्ष वेधून घेते. इमारतीच्या परिसरात असणारे सुसज्ज उद्यान विद्यार्थी व पर्यटकांना आकर्षित करते. सीओईपीला हेरिटेज इमारतीचा ‘अ’ दर्जा मिळाला आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांपूर्वी या इमारतीची डागडुजी करण्यात आली. सीओईपी प्रशासनाने डागडुजीचे काम करताना इमारतीचा हेरिटेज दर्जा जपण्याची काळजी घेतली. सीओईपीचे माजी संचालक डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या कार्यकाळात हे कामकाज पूर्ण झाले. केवळ भारतातच नाही तर परदेशांतही सीओईपीच्या विद्यार्थ्यांकडे आदराने पाहिले जाते.