समन्वयाभावी रखडला रस्ता

By admin | Published: October 3, 2015 01:22 AM2015-10-03T01:22:12+5:302015-10-03T01:22:12+5:30

गेल्या दोन वर्षांपासून महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरण यांच्या वादात रावेत ते चिंचवड जुना जकात नाका या सहापदरी मार्गावरील वाल्हेकरवाडी गावठाणापासून

Coordinated road | समन्वयाभावी रखडला रस्ता

समन्वयाभावी रखडला रस्ता

Next

अतुल क्षीरसागर, रावेत
गेल्या दोन वर्षांपासून महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरण यांच्या वादात रावेत ते चिंचवड जुना जकात नाका या सहापदरी मार्गावरील वाल्हेकरवाडी गावठाणापासून ते ओढ्यापर्यंतच्या भागाचे रस्त्यासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचे भूसंपादन झाले नसल्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे. रस्त्यासाठी जवळपास ३७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, आतापर्यंत सुमारे १७ ते १८ कोटी रुपये खर्च झाला आहे.
चिंचवड जकात नाका ते रावेत हा रस्ता वाल्हेकरवाडीमधून जात असून, या रस्त्याचे काम आजही अपूर्णच आहे. हा रस्ता चिंचवड जुना जकात नाका येथून सुरुवात होऊन पुढे औंधमार्गे येणारा बीआरटी रस्ता रावेत येथे मिळतो. पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या लोकांसाठी हा एक चांगला मधला मार्ग असून, या रस्त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचते. पण, या रस्त्याचे काम असे अर्धवट अवस्थेत आहे. या रस्त्याचे काम जवळपास पाच वर्षांपासून सुरू होऊन नवनगर विकास प्राधिकरणातील हद्दीतील रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन ३१ डिसेंबर २०१४ रोजी पूर्ण झाले आहे. तेथून पुढील रस्त्यासाठी आवश्यक असणारे भूसंपादन महापालिकेकडून न झाल्यामुळे अजूनही हा रस्ता वापरात नाही.
या रस्त्याचा पूर्ण खर्च महापालिका करणार होती. पण, त्याची काही हद्द प्राधिकरणाच्या हद्दीत येत असल्यामुळे हा रस्ता प्राधिकरणाकडे सोपविण्यात आला.
या रस्त्याची पूर्ण लांबी ३.१५ किमी व रुंदी ३४.५ मी. असून, प्राधिकरणाच्या हद्दीतील २.६३ किमी लांबी आणि पूल बांधून पूर्ण झाले असून, महापालिकेच्या हद्दीतील वाल्हेकरवाडी येथील सुमारे २०० मीटरपेक्षा जास्त जागेच्या भूसंपादनाचे काम अपूर्ण राहिले आहे. या रस्त्याच्या कामाचा ठेका ठेकेदार अजवाडी यांना देण्यात आला होता.
प्राधिकरणाच्या हद्दीतील रस्ता पूर्ण झाला असून, तो वापरण्यायोग्य आहे, असेही जाहीर करण्यात आले आहे. प्राधिकरणाची जबाबदारी त्यांनी पार पडली आहे.
आता महापालिकेच्या जबाबदारी असल्यामुळे त्यांच्याकडून काम होण्याची प्रतीक्षा नागरिकांना लागून राहिली आहे. हा महापालिकेच्या हद्दीतील रस्ता राहिल्यामुळे वाहनचालकांना व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विकास आराखड्यानुसार रावेत ते चिंचवड जकात नाकामार्गावरील वाल्हेकरवाडी गावठाण ते नाल्यापर्यंतचा भाग नवनगर प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो. तेथील भूसंपादन महापालिकेच्या वतीने करता येईल. मात्र, पुढील काम प्राधिकरणाला पूर्ण करावे लागेल, असे महापालिका नगररचना विभागाचे म्हणणे आहे.
रस्ता प्रशस्त झाला, परंतु वाहतुकीस खुला नसल्यामुळे संध्याकाळच्या वेळेला गर्दुल्यांचा अड्डा या ठिकाणी भरत असल्यामुळे रात्री १-२पर्यंत गर्दुल्यांचा गोंधळ या ठिकाणी चालू असतो. त्यामुळे आजूबाजूला असणाऱ्या विविध सोसायट्यांतील नागरिकांना व महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: Coordinated road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.