महावितरणच्या कोविड-१९ कर्मचाऱ्यांसाठी समन्वय कक्ष, ४५० जणांना लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:09 AM2021-04-13T04:09:34+5:302021-04-13T04:09:34+5:30

मागील वर्षापासून आतापर्यंत पुणे परिमंडलातील ३७४ पुरुष व ७६ महिला अशा ४५० अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाचा ...

Coordinating room for MSEDCL Kovid-19 employees, 450 infected | महावितरणच्या कोविड-१९ कर्मचाऱ्यांसाठी समन्वय कक्ष, ४५० जणांना लागण

महावितरणच्या कोविड-१९ कर्मचाऱ्यांसाठी समन्वय कक्ष, ४५० जणांना लागण

Next

मागील वर्षापासून आतापर्यंत पुणे परिमंडलातील ३७४ पुरुष व ७६ महिला अशा ४५० अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यापैकी ३४४ जण कोरोनामुक्त झाले असून ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या ९ पैकी ७ जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ३० लाख रुपयांची सानुग्रह मदत देण्यात आली आहे. तर सद्य:स्थितीत ९७ अधिकारी व कर्मचारी रुग्णालय आणि घरी उपचार घेत आहेत.

कोरोनाच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महावितरणचे अभियंता व कर्मचारी सुरळीत व अखंडित वीजपुरठ्यासह विविध ग्राहकसेवा देत आहेत. मात्र पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच ग्रामीण भागात देखील गेल्या महिन्याभरापासून कोरोना संसर्गाचा उद्रेक सुरु आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अनेक अधिकारी व कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबीयांतील व्यक्तींना तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे परिमंडल कार्यालयात कोविड- १९ समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर हे कक्षप्रमुख म्हणून काम पाहत आहे. रुग्णालयांशी संपर्क साधून बेड उपलब्ध करून देणे तसेच प्लाझ्मा, औषध व इतर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हा कक्ष कार्यरत आहे.

महावितरणमधील सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांसाठी कोरोना आजाराचा समावेश असलेला समूह आरोग्यविमा काढण्यात आलेला आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आरोग्य सेवेबाबत काही अडचणी असल्यास महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्या कार्यालयप्रमुखांनी थेट उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी काटकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रभारी मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केले आहे. अत्यावश्यक असलेल्या वीजक्षेत्रात ग्राहकसेवा देताना सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात किंवा क्षेत्रीय काम करताना कोविड-१९ चा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण खबरदारी घ्यावी तसेच कार्यालयांमध्ये कोविड-१९ संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असे निर्देश प्रभारी मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिले आहेत.

Web Title: Coordinating room for MSEDCL Kovid-19 employees, 450 infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.