कोरेगाव-भीमाच्या पारदर्शक तपासासाठी समन्वय समिती, पोलिसांना करणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 10:19 PM2018-01-09T22:19:48+5:302018-01-10T19:29:29+5:30

कोरेगाव-भीमा येथील प्रकरणातील गुन्ह्यांच्या योग्य तपासासाठी आणि पोलिसांना मदत करण्यासाठी सर्व दलित संघटनांच्या १० जणांची समिती स्थापन करण्यात येणार असून, या घटनेचा पारदर्शक तपास केला जाईल, अशी घोषणा विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केली.

Coordination Committee for the transparency check of Koregaon-Bhima, help police | कोरेगाव-भीमाच्या पारदर्शक तपासासाठी समन्वय समिती, पोलिसांना करणार मदत

कोरेगाव-भीमाच्या पारदर्शक तपासासाठी समन्वय समिती, पोलिसांना करणार मदत

Next

पुणे : कोरेगाव-भीमा येथील प्रकरणातील गुन्ह्यांच्या योग्य तपासासाठी आणि पोलिसांना मदत करण्यासाठी सर्व दलित संघटनांच्या १० जणांची समिती स्थापन करण्यात येणार असून, या घटनेचा पारदर्शक तपास केला जाईल, अशी घोषणा विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केली.

ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात मंगळवारी नांगरे-पाटील यांनी सर्व दलित संघटनांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सर्व संघटनांनी प्रशासन, पोलीस यांनी घेतलेल्या बघ्याच्या भूमिकेवर तीव्र रोष व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. कोरेगाव-भीमा येथील घटनेबाबत दलित संघटनांशी चर्चा करण्यासाठी विश्वास नांगरे-पाटील यांनी बैठक बोलाविली होती. या बैठकीला पोलीस अधीक्षक सुवेझ हक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह सर्व दलित संघटनांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत दलित नेत्यांनी प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवर रोष व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, २९ डिसेंबरला वढूला घडलेल्या घटनेत अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ३० डिसेंबरला कोरेगाव ग्रामपंचायतीने १ जानेवारीला गाव बंद करण्याचा ठराव केला. हा ठराव असंसदीय असल्याने त्याची माहिती मिळाल्यानंतरही प्रशासनाने व पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. सोशल मीडियावर १ जानेवारीला जमायचे असे संदेश फिरत होते. तरीही त्याकडे दुर्लक्ष केले. १ जानेवारीला हिंदुत्ववादी कार्यकर्ते झेंडे घेऊन जमावाने निघून २ किलोमीटरपर्यंत चालत आले. नगर रोडपर्यंत आले तरीही त्यांना अडविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला नाही. सणसवाडी येथे मोडतोड सुरू केल्यानंतर सुरुवातीला बघ्याची भूमिका घेतली. दलित समाजाचा विश्वास संपादन करायचा असेल तर संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे आणि आनंद दवे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी. या भागातील सर्व व्हिडीओ फुटेज तपासावे. तेथील मोबाईल टॉवरची माहिती घेऊन कोणकोणाशी संपर्कात होते, याची माहिती घ्यावी. व्हिडीओत दिसतात, त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी दलित संघटनांच्या वतीने करण्यात आली, असे डॉ. धेंडे यांनी सांगितले.

विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले की, या घटनेचा पारदर्शक तपास होईल, आपल्याकडे जे काही इनपुट असेल, ते पोलिसांना द्यावेत. पोलिसांना तपासात मदत करण्यासाठी दलित संघटनांमधील १० जणांची समिती स्थापन करू. ते पोलिसांना मदत करतील. लोकांकडे असलेले मेसेज, व्हिडीओ याचे इनपूट देण्यासाठी त्यांनी एक मोबाईल क्रमांकही (८२०८७४६४०८) यावेळी सर्वांना दिला, त्यावर माहिती पाठविण्याचे आवाहन केले.

Web Title: Coordination Committee for the transparency check of Koregaon-Bhima, help police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.