युतीची बैठक निर्णयाविनाच
By admin | Published: January 22, 2017 04:55 AM2017-01-22T04:55:14+5:302017-01-22T04:55:14+5:30
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडीचे घोडे पुढे जात असताना भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांच्यातील युतीचे गाडे मात्र आकड्यांच्या घोळातच अडकले आहे. डेक्कन येथील
पुणे : काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडीचे घोडे पुढे जात असताना भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांच्यातील युतीचे गाडे मात्र आकड्यांच्या घोळातच अडकले आहे. डेक्कन येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या दोन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीत शनिवारी काहीही निर्णय होऊ शकला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ जवळ आली तरीही अद्याप या दोन पक्षांमध्ये जागावाटपाचा प्राथमिक प्रस्तावदेखील तयार झालेला नाही. शनिवारच्या बैठकीत दोन दिवसांनी पुन्हा भेटण्याचा निर्णय झाला, एवढीच माहिती देण्यात आली.
भाजपाचे समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, शिवसेनेचे माजी मंत्री शशिकांत सुतार, शहराध्यक्ष विनायक निम्हण यांची शनिवारी दुपारी बैठक झाली. तीत कोणी किती जागा घ्यायच्या, यावर चर्चा झाली. मावळत्या पालिका सभागृहात भाजपाच्या २४ व शिवसेनेच्या १५ जागा आहेत. केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरातून सर्वाधिक ओघ भाजपाकडे सुरू आहे. त्याचाच फायदा घेत भाजपाकडून शिवसेनेला कमी जागा दिल्या जात
आहेत. सेनेला मात्र जास्त जागा हव्या
आहेत. त्यामुळेच ही चर्चा पुढे जायला
तयार नाही. (प्रतिनिधी)
दोन दिवसांनी पुन्हा बैठक
युतीसाठी शनिवारी झालेल्या दुसऱ्या बैठकीतही यावर काही निर्णय झाला नाही. दोन्ही पक्षांचे नेते आपापल्या म्हणण्यावर आग्रही राहिले. अखेरीस दोन दिवसांनी पुन्हा बैठक घेऊन चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचीच माहिती पत्रकारांना देण्यात आली. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाला जागावाटपात आपला वरचष्मा ठेवायचा आहे.
सेनेला ते मान्य नाही. मावळत्या सभागृहात कमी जागा असल्या तरीही शहराच्या काही भागात सेनेचे चांगले वर्चस्व आहे. भाजपाने त्याचा विचार करावा, असे सेनानेत्यांचे म्हणणे आहे. बैठकीतील चर्चेतही पालिकेत सत्ता येणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सेनेने विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असे भाजपाने सांगितले असल्याचे समजते.