कोरेगाव भीमा घटना सुनियोजित, शोध समितीचा दावा, पोलीस अधीक्षकांना देणार घटनेचा अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 01:34 AM2018-01-21T01:34:55+5:302018-01-21T01:35:06+5:30
कोरेगाव भीमा येथील हल्ला हा पूर्वनियोजित कट होता. स्थानिक पोलीस यंत्रणेला अनुचित प्रकार होणार असल्याचे माहिती असूनही त्यांनी ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे घटनेतील दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी कोरेगाव भीमा शोध समितीतर्फे शनिवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली.
पुणे : कोरेगाव भीमा येथील हल्ला हा पूर्वनियोजित कट होता. स्थानिक पोलीस यंत्रणेला अनुचित प्रकार होणार असल्याचे माहिती असूनही त्यांनी ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे घटनेतील दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी कोरेगाव भीमा शोध समितीतर्फे शनिवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली.
कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या सूचनेनुसार सामाजिक क्षेत्रात काम करणाºया १० जणांची शोध समिती स्थापन करण्यात आली होती. समितीमध्ये पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, भारिप बहुजन महासंघाचे प्रा. म. ना. कांबळे, राहूल मखरे, विकास साळवे, दत्ता पोळ, राजेंद्र गायकवाड, किरण शिंदे, रमाकांत खंडे आदींचा समावेश होता.
समितीने शिक्रापूर, लोणी काळभोर, कोरेगाव भीमा, पेरणे, वढू आदी गावांमधील नागरिकांशी संवाद साधला. त्यावर प्राप्त माहितीच्या आधारे अहवाल तयार केला असून, सोमवारी (दि.२२) तो पोलीस अधीक्षकांना दिला जाणार आहे.
धेंडे म्हणाले, कोरेगाव भीमा घटना हा दलित विरूध्द मराठा या समाजातील संघर्ष नाही. काही कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला.
आम्ही या घटनेशी संबंधित अनेकांशी संवाद साधला. त्यांचे सुमारे ५०० फोटो, व्हिडीओ आणि
आॅडिओ संकलित केले. त्यातून हा
पूर्व नियोजित कट होता.
हल्ला झाल्यानंतर दंगल उफाळून आली होती. लहान मुलांचे भांडण झाले, तरी दलित वस्तीवर हल्ला
होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे येथे तत्काळ सामाजिक सलोख्याचे वातावरण करण्याची गरज आहे.
मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे हे या कटात सहभागी असल्याचे उपलब्ध माहितीच्या आधारे दिसून येते, असा दावा प्रा. कांबळे यांनी केला.
समाधीचे शुद्धिकरण केले?
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर, काही जातीयवादी मानसिकतेच्या लोकांनी समाधीचे शुद्धिकरण केले, अशी माहिती शोध समितीला मिळाल्याचा दावा डॉ. धेंडे यांनी केला.
नुकसानग्रस्तांनी भरपाई देणार -जिल्हाधिकारी सौरभ राव
कोरेगाव भीमा, सणसवाडी व अन्य ठिकाणच्या नुकसानीचे साडेदहा कोटींचे पंचनामे करण्यात आले असून, आॅडिटनंतर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात येणार आहे. दंगलीतील कारवाईत निर्दोषांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, असे सांगत गावातील सामाजिक सलोख्याबाबत ग्रामस्थांवर जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी कौतुकाची थाप दिली. कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील ग्रामस्थांची भेट घेत, श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील संभाजी महाराज समाधीस्थळ व गोविंद गायकवाड यांच्याही समाधीस्थळाची जिल्हाधिकारी राव यांनी पाहणी केली.