तांब्याचा लखलखाट भारी, जुन्या काळाची याद न्यारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:11 AM2021-03-21T04:11:39+5:302021-03-21T04:11:39+5:30

पुणे : पुण्यातली तांबट आळी ही प्रसिद्ध. पण कमी झालेली मागणी आणि त्याच बरोबर इतर व्यवसायातकडे वळलेले लोक यामुळे ...

Copper glitter heavy, reminiscent of old times | तांब्याचा लखलखाट भारी, जुन्या काळाची याद न्यारी

तांब्याचा लखलखाट भारी, जुन्या काळाची याद न्यारी

googlenewsNext

पुणे : पुण्यातली तांबट आळी ही प्रसिद्ध. पण कमी झालेली मागणी आणि त्याच बरोबर इतर व्यवसायातकडे वळलेले लोक यामुळे येथील खासियत असणाऱ्या तांब्याच्या जुन्या वस्तू कमी होत गेल्या. त्यामुळे येथील संस्कृती, या आळीच ओळख जिवंत राहावी आणि लोकांना कळावी यासाठी येथीलच एक रहिवासी धडपडताहेत. ‘आनंदी संसार’ या नावाने त्यांनी तांब्याच्या सुमारे चारशे वस्तूंचे प्रदर्शन उभारले आहे.

कसबा पेठेत राहणारे गिरीश पोटफोडे शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरीला टाटा मोटर्सच्या फायनान्स विभागात लागले. मात्र तांबट आळीतल्या वस्तूंची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातच त्वष्टा कासार मंडळाच्या गणेश उत्सवाच्या शंभर वर्षाच्या निमित्ताने भरलेले एक प्रदर्श त्यांनी पाहिले. त्यावेळी मांडलेल्या वस्तू बघून पोटफोडे यांची आवड उफाळून आली. निवृत्तीनंतर त्यांनी आपल्या छंदाकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात केली आणि यातूनच ‘आनंदी संसार’ फुलला.

पण अर्थातच ही जुनी भांडी गोळा करणे सोपे नव्हते. पोटफोडे सांगतात, “काही भांडी माझ्या घरातच होती. अगदी आजीच्या काळातले घंगाळे, बंब, अशा काही वस्तू. पण इतरही वस्तू गोळा करायच्या होत्या. त्यासाठी मग परिसरातल्या ओळखीच्या लोकांपासून ते अगदी जुन्या बाजारापर्यंत सगळीकडच्या फेऱ्या झाल्या. एक-एक करत वस्तू गोळा होत गेल्या आणि त्यातूनच हे घरगुती प्रदर्शन उभे राहिलं.” सध्या कोरोनामुळे सगळे बंद असले तरी पोटफोडे यांच्या कसबा पेठेतल्या घरी हे प्रदर्शन पाहता येते. याचे मोठे संग्रहालय करण्याची त्यांची इच्छा आहे.

चौकट

भरलेला आनंदी संसार

या ‘आनंदी संसारा’त लहान-मोठे बंब, अष्टविनायक तांब्या भांडे, ठोक्याचे पेले, पाण्याचा जग, चहाची किटली, शाळेचा डबा, मानाच्या पेट्या सुरमा लावणी, प्रवासी तांब्या बर्नर, टाळ, वजन, वजन काटा अशा अनेक वस्तू गोळा झाल्या आहेत. यासाठी गिरीश पोटफोडे यांनी दोन लाख रुपयांची पदरमोड केली आहे.

चौकट

तीनशे होती कारागीरांची घरे

“पूर्वी आमच्या तांबट आळीत तांब्या-पितळेची भांडी बनवणाऱ्या लोकांची जवळपास तीनशे घरे आणि कारखाने होते. पण आता त्यातले तीस शिल्लक राहिलेत. त्यातही अनेक जण ‘अँटिक’ वस्तूंकडे वळले आहेत. त्यामुळे जुन्या पारंपरिक वस्तू नेमक्या होत्या कशा आणि त्या मिळतात कुठे हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी हे प्रदर्शन उभारले. माझ्या प्रदर्शनात कोण काय बनवतो याची माहिती आहे. जेणेकरून लोक ते थेट खरेदी करू शकतील.”

- गिरीश पोटफोडे

Web Title: Copper glitter heavy, reminiscent of old times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.