सायबर फसवणूक झाल्यानंतरही पैसे मिळवण्यात पोलिसांना यश
By भाग्यश्री गिलडा | Published: August 24, 2023 04:54 PM2023-08-24T16:54:11+5:302023-08-24T16:54:29+5:30
गुन्हा घडल्यावर लगेचच पोलिसांना तक्रार दिली होती
पुणे : सायबर फसवणुकीमध्ये गमावलेले पैसे एका नोकरदाराच्या प्रसंगावधानामुळे परत मिळवण्यात यश आले. गुन्हा घडल्यावर लगेचच पोलिसांना तक्रार दिली. त्यामुळे सायबर चोरट्यांच्या फसवणुकीच्या प्लॅनला धुडकावून लावण्यात कोंढवा पोलीस ठाण्यातील सायबर पथकाला यश आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका नोकरदाराचा आय डी व पासवर्ड घेऊन त्यांच्या ई व्हायलेटमधून पैसे काढून घेतल्याची तक्रार १० ऑगस्ट २०२३ रोजी कोंढवा पोलीस ठाण्यात आली होती. त्याची दाखल घेत पोलिसांनी तातडीने संबंधित कंपनीला पत्रव्यवहार करून ते पैसे गोठवण्यास सांगितले. चोरट्यांनी एकूण ६० हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले होते त्यातील ५८ हजार ५०० रुपये परत मिळवण्यात आले. त्यामुळे सायबर चोरट्यांच्या हाती केवळ दीड हजार रुपये लागले.
पोलीस शिपाई निलेश शेलार यांनी तातडीने प्राथमिक माहिती मिळवून संबंधित कंपनीला ई मेल केला. त्यावेळी सायबर चोरट्यांनी तक्रादार यांच्या ई वॉलेटमधून काढलेल्या ६० हजार रुपयांपैकी दीड हजार रुपये दुसरीकडे वळविले आहेत असे संबंधित कंपनीने शेलार यांना सांगितले. ते वगळता उरलेले ५८ हजार ५०० रुपये कंपनीला तातडीने गोठवायला सांगून पुन्हा तक्रारदार यांच्या ई वॉलेटमध्ये वळते करण्यास सांगितले.