‘एक होता कार्व्हर’ची प्रत कार्व्हरच्या अमेरिकेतल्या जन्मस्थळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:11 AM2021-03-19T04:11:28+5:302021-03-19T04:11:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्यावरील ‘एक होता कार्व्हर’ हे लेखिका वीणा गवाणकर यांचे पुस्तक म्हणजे ...

A copy of "One was Carver" at Carver's birthplace in the United States | ‘एक होता कार्व्हर’ची प्रत कार्व्हरच्या अमेरिकेतल्या जन्मस्थळी

‘एक होता कार्व्हर’ची प्रत कार्व्हरच्या अमेरिकेतल्या जन्मस्थळी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्यावरील ‘एक होता कार्व्हर’ हे लेखिका वीणा गवाणकर यांचे पुस्तक म्हणजे एका न संपणाऱ्या संघर्षाची चित्तथरारक कहाणी....मराठी वाचकांसाठी प्रेरणादायी ठरलेले हे पुस्तक आता थेट कार्व्हरच्या जन्मस्थळी पोहोचले आहे. पुस्तकाला चाळीस वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून राजहंस प्रकाशनातर्फे पुस्तकाची पंचेचाळीसावी आवृत्ती अमेरिकेतील ‘जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर राष्ट्रीय स्मारकाला’ समर्पित करण्यात आली.

पुस्तकाला चाळीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल प्रकाशनातर्फे पंचेचाळीसावी आवृत्ती प्रकाशित झाली. या मराठी पुस्तकाची प्रत नुकतीच कार्व्हरच्या जन्मस्थळी अर्पण करण्यात आली. कन्सास मेडिकल सेंटर येथे शास्त्रज्ञ आणि सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या मूळच्या सांगलीच्या उदयन आपटे यांनी ही प्रत सदर स्मारकाला समर्पित केली. ही प्रत सदर स्मारकाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी पल्लवी आपटे उपस्थित होत्या.

आपटे म्हणाले, “मी ‘एक होता कार्व्हर’ वाचून मोठा झालो आणि त्यामुळे शास्त्रज्ञ होण्यासाठी मला प्रेरणा मिळाली. माझ्या आयुष्यावर कार्व्हरचा मोठा प्रभाव आहे. मागील ४० वर्षात माझ्याप्रमाणे असंख्य मराठी मुलांसाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरले असेल. भारतात आणि परदेशातही मोठ्या प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेसाठी ही निश्चितच गौरवास्पद बाब आहे.”

दिलीप माजगावकर म्हणाले, “मागील ४० वर्षांपासून कार्व्हर वाचला जात आहे, ही प्रकाशक म्हणून आनंद देणारी बाब आहे. त्याबरोबरच या पुस्तकाचा इंग्रजी, गुजराती, हिंदी, कानडी अशा इतर भाषांतही अनुवाद झालेला आहे. अमेरिकेतील ‘नासा’च्या मंगळ मोहिमेत भारतीय संशोधक म्हणून काम पाहणारे पनवेलचे पराग वैशंपायन हेही आपल्या शास्त्रज्ञ होण्याचे श्रेय ‘एक होता कार्व्हर’ला देतात. जळगावमधील तासगाव येथे राहून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केलेले सुधीर शिंदे आता स्वित्झर्लंड येथे पीएचडी करत असून त्यांनी आपल्या यशाचे श्रेय ‘एक होता कार्व्हर’ आणि लेखिका वीणा गवाणकर यांना दिले आहे”

चौकट

कार्व्हर का महत्त्वाचा ?

“कार्व्हर हे एक ‘असणे’ आहे. ते स्थलकालातीत आहे. त्याने दाखवलेला शाश्वत विकासाचा मार्ग अखिल मानवजातीच्या हिताचा आहे म्हणूनच तो आजही अनुकरणीय ठरतो. हव्यासाला बळी न पडता निसर्गाशी मैत्री राखून, समुचित तंत्रज्ञानाच्या आधारे आपण सुखी समाधानी आयुष्य जगू शकतो; हे त्याने आपल्या जगण्यातून दाखवून दिलं. हे त्याचं जगणंच स्थलकालाच्या मर्यादा ओलांडून आमच्यापर्यंत पोहोचलं. आम्हाला कार्व्हर आमचा वाटतो, तो त्याच्या या वृत्तीमुळेच. हा कार्व्हर माझ्या आयुष्यात आला नसता; तर एक प्रचंड पोकळी राहून गेली असती, त्याने मला समृद्ध केलंय.”

- वीणा गवाणकर, लेखीका

Web Title: A copy of "One was Carver" at Carver's birthplace in the United States

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.