बारावीच्या आॅनलाइन आयटी परीक्षेत कॉपी?
By admin | Published: March 25, 2016 03:48 AM2016-03-25T03:48:26+5:302016-03-25T03:48:26+5:30
ओतूर येथे अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात १२ वीच्या आॅनलाइन आयटी विषयाच्या परीक्षेत कॉपी प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी धाड टाकून प्रकरण उघडकीस आणल्याची
लेण्याद्री : ओतूर येथे अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात १२ वीच्या आॅनलाइन आयटी विषयाच्या परीक्षेत कॉपी प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी धाड टाकून प्रकरण उघडकीस आणल्याची माहिती जुन्नर पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी के. डी. भुजबळ यांनी दिली.
दुपारी ४.३0 वाजता ओतूर येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातील संगणक लॅबमध्ये के. डी. भुजबळ आणि त्यांचे सहकारी यांनी प्रवेश केला असता कॉपीचा प्रकार उघडकीस आला. शिक्षक एका विद्यार्थ्याला उत्तरे सांगत असताना सापडले, तर विद्यार्थ्यांकडे आयटीची पुस्तके, मोबाईल फोन आढळले. एक विद्यार्थिनी चक्क पुस्तक समोर उघडे ठेवून परीक्षा देत होती. परीक्षा घेणारा शिक्षकही टेंपररी निघाला. कॉलेजमध्ये प्राचार्य व उपप्राचार्य कोणीही उपस्थित नव्हते. कॉपी साहित्य आणि मोबाईल संच जप्त करून ताब्यात घेण्यात आले.
सध्या १२ वीची आॅनलाइन आयटी विषयाची परीक्षा सुरू आहे. संगणक लॅब सुविधा असलेल्या शाळा-कॉलेजमध्ये ही परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षेची जबाबदारी संबंधित शाळा-कॉलेजचे प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.
आॅनलाइन आयटी परीक्षेत कॉपी चालत असल्याचा आणि शिक्षकही विद्यार्थ्यांना मदत करीत असल्याचा गोपनीय मेल राज्य मंडळाकडून पुणे विभागीय मंडळाकडे आला. त्यामध्ये ६ महाविद्यालयांची नावे होती. तेवढीच गोपनीयता राखून पुणे विभागीय मंडळाने मेलद्वारेच जुन्नर सी २० कस्टडीचे कस्टोडियन विस्तार अधिकारी के. डी. भुजबळ यांना पाठवून प्रकरणाचा छडा लावण्याच्या सूचना दिल्या. विभागीय सचिव पुष्पलता पवार आणि विभागीय अध्यक्ष सुनील मगर यांनी स्वत: मोबाईलवरून सूचना दिल्या. भुजबळ यांनी हे प्रकरण तेवढ्याच गांभीर्याने घेऊन काम सुरू केले. सर्व कॉलेजला भेटी द्याव्या लागल्या. त्यामध्ये आंबेगाव तालुक्यातील ३ आणि जुन्नर तालुक्यातील ३ कनिष्ठ महाविद्यालये होती. (वार्ताहर)
तो प्रकार
कॉपीचा नसावा...
या संदर्भात प्राचार्यपदाचा नव्यानेच कार्यभार स्वीकारलेले पंडित शेळके म्हणाले, की तिथे जनरेटर बॅकअपच्या आधारे परीक्षा घेतली जात होती. त्यामध्ये अनेक अडथळे येत होते. त्यामुळे संबंधित प्राध्यापक परीक्षेपूर्वी त्यांना माहिती देत होते. कॉपीचा तसा प्रकार घडला नसावा.
विभागीय मंडळाकडे
अहवाल सादर
शिक्षकांचे वर्तन आणि विद्यार्थी कॉपी प्रकरणाचा अहवाल तसेच प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्या गैरहजेरीचा अहवाल विभागीय मंडळाकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आला आहे.