ताजमहालाच्या दस्ताऐवजाची प्रत पुण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 09:49 PM2018-05-25T21:49:10+5:302018-05-25T21:49:10+5:30
कलाकुसरीचे अद्भुत सौंदर्य आणि अलोट प्रेमाचे प्रतीक असलेल्या ताज महालाचे आता पुण्याशी नवा ऋ णानुबंध जोडला जाणार आहे.
पुणे : भारतातील सर्वसामान्य माणसापासून ते जगप्रसिध्द व्यक्तींपर्यंत सर्वांच्या मनात जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या आग्रा येथील ताज महालाने आगळी वेगळी अशी खास ‘जागा’ निर्माण केली आहे. या ऐतिहासिक वास्तूचा मोह भल्याभल्यांना झाला. कलाकुसरीचे अद्भुत सौंदर्य आणि अलोट प्रेमाचे प्रतिक असलेली या वास्तूचे आता पुण्याशी नवा ऋ णानुबंध जोडला जाणार आहे. कारण ताज महालाच्या मालकी हक्काविषयी हस्तांतरणासंदर्भातील ऐतिहासिक दस्ताऐवज पुण्याकडे उपलब्ध झाली आहे. यामध्ये ऐतिहासिक वास्तूचे मालकी हक्क सैन्यदल की नागरी प्रशासनाकडे असावे या संदर्भातील पत्र व्यवहार झालेले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांच्या प्रयत्नातून ही प्रत मिळणार असून खडकीच्या संरक्षण दलातर्फे नव्याने उभारण्यात आलेल्या जतन आणि संशोधन केंद्रात (ए.यु. अॅन्ड आर. सी.) ही प्रत संग्रहित करण्यात येणार आहे. मुघलांची राजवट संपुष्टात आल्यानंतर ताज महालाचा मालकी हक्क ब्रिटिशांकडे आला होता. तब्बल दोनशे पन्नास वर्षे ताजमहाल त्यांच्या नियंत्रणाखाली होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर ताज महालाचा मालकी हक्क भारत सरकारकडे सुपूर्द करण्यात आला होता. दरम्यान ताजमहाल हा सैन्याच्या ताब्यात असावा,की नगरी प्रशासनाकडे यासंदर्भात कंपनीचे अधिकारी कर्नल क्लेअर यांनी स्थानिक प्रशासनाकडे पत्र लिहले होते. ब्रिटिशांकडून मालकी हक्क मिळाल्यानंतर ताज महालाचे जतन करण्याची जबाबदारी भारत सरकारतर्फे पुरातत्व खात्याकडे सोपविण्यात आली होती.
.........................
ऐतिहासिक वारसा या विषयाबाबत माझ्या मनात प्रचंड आवड आणि कुतुहल आहे. ताजमहाल विषयीचे कागदपत्रांची जबाबदारी माझ्याकडे होती. त्यामुळे ताजमहालाच्या हक्काबाबतच्या कागदपत्राची एक प्रत स्वत:जवळ असावी असे मनोमन वाटत होते. त्यामुळे तेथील अधिकाऱ्यांची परवानगी घेतली. एक प्रत माझ्याकडे ठेवली. या कागदपत्राची मूळ प्रत दिल्ली येथील कार्यालयात आहे. पुण्यातील केंद्रातही या कागदपत्राचे जतन व्हावे, अशी ईच्छा होती. त्यामुळेच हे कागदपत्र जतन केंद्राकडे सोपविले. या पत्रव्यवहारांमधून इंग्रज अधिकाऱ्यांची इतिहासातील वारसास्थळांप्रतीची आत्मीयता दिसून येते. डॉ. डी. एन. यादव