बारावीच्या परीक्षेत कॉपी करण्याचे प्रमाण वाढतंय; फिजिक्सच्या पेपरला ५० बहाद्दरांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 02:46 PM2023-02-28T14:46:06+5:302023-02-28T14:46:16+5:30
विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्यावर त्यांना पुढील पेपरवर प्रतिबंध केला जातो व त्यामुळे त्यांचे वर्ष वाया जाते
पुणे: बारावीच्या भाैतिकशास्त्र (फिजिक्स)सह लाॅजिक आणि एमसीव्हीसी पेपर १ विषयाच्या परीक्षेदरम्यान काॅपी करणाऱ्या ५० विद्यार्थ्यांवर कारवाईचा करण्यात आहे. त्यामध्ये पुणे विभागीय मंडळातील विविध परीक्षा केंद्रांवरील १९ काॅपीबहाद्दरांचा समावेश आहे.
बाेर्डाच्या बारावी परीक्षेस मंगळवार २३ फेब्रुवारीला सुरुवात झाली. दरम्यान, इंग्रजी वगळता इतर भाषा विषयांच्या पेपरला काॅपी केल्याप्रकरणी ३९ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली हाेती. त्यानंतर, साेमवारी २७ फेब्रुवारी राेजी सकाळच्या सत्रात फिजिक्ससह, लाॅजिक आणि एमसीव्हीसी पेपर १ या विषयाचे पेपर झाला. हा विषय अनेकांना आव्हानात्मक वाटताे. त्यामुळे अनेक केंद्रावर काॅपी करण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून आले. राज्यातील परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये तब्बल ५० जण काॅपी करताना आढळून आले आहेत.
औरंगाबाद विभागीय मंडळात सर्वाधिक २२ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. त्या पाठाेपाठ पुणे मंडळातील परीक्षा केंद्रांवर १९ जणांना काॅपी करताना पकडण्यात आले. अमरावती आणि लातूर ३, तसेच नागपूर, काेल्हापूर, नाशिक प्रत्येकी १ अशा एकूण ५० काॅपीबहाद्दरांवर साेमवारी कारवाई करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान गैरमार्गाचा वापर करू नये, यासाठी परीक्षा केंद्रावर भरारी पथकाद्वारे भेट देणे, तसेच दक्षता बाळगण्यात येणार असल्याचे शिक्षण मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
कॉपी पकडल्यास पुढच्या पेपरवर प्रतिबंध
बारावीच्या परीक्षेत कॉपी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. परीक्षेदरम्यान केंद्रांवर भरारी पथकाद्वारे पाहणी केली जात आहे. विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जात आहे. एकदा कारवाई केल्यावर विद्यार्थ्यांना पुढचे कुठलेही पेपर देता येत नाही. त्यामुळे त्यांचे वर्ष वाया जाते. म्हणून विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान गैरमार्गाचा वापर करू नये असे शिक्षण मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.