भूमिगत मेट्रोसाठी पुण्याचा खडक योग्य

By admin | Published: December 30, 2016 04:56 AM2016-12-30T04:56:40+5:302016-12-30T04:56:40+5:30

जमिनीखालील मेट्रो प्रकल्पासाठी पुण्याची भौगोलिक स्थिती अत्यंत चांगली असून, अवघ्या तीन ते सहा मीटर अंतरावरच मेट्रोचा पाया घेण्यासाठी आवश्यक खडक आढळून आला आहे.

Coral reef for underground metro | भूमिगत मेट्रोसाठी पुण्याचा खडक योग्य

भूमिगत मेट्रोसाठी पुण्याचा खडक योग्य

Next

पुणे : जमिनीखालील मेट्रो प्रकल्पासाठी पुण्याची भौगोलिक स्थिती अत्यंत चांगली असून, अवघ्या तीन ते सहा मीटर अंतरावरच मेट्रोचा पाया घेण्यासाठी आवश्यक खडक आढळून आला आहे. या खडकामुळे मेट्रोच्या पायाभरतीच्या (फाउंडेशन) कामाचा खर्च तब्बल ३० ते ४० टक्क्यांनी कमी होणार आहे. यामुळे वेळे पूर्वीच मेट्रोचे काम पूर्ण होईल, असा विश्वास महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी येथे व्यक्त केला.
पुणे मेट्रो प्रकल्पास राज्य शासनाने ८ डिसेंबर रोजी मान्यता दिल्यानंतर नागपूर मेट्रो रेल प्रशासनातर्फे शहरात सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार, जमिनीचा पोत पाहण्याचे काम रामवाडीपासून सुरू करण्यात आले आहे. संपूर्ण मेट्रो मार्गावर प्रत्येक १०० मीटर अंतरावर जमिनीची रचना तसेच जमिनीचा पोत तपासला जाणार आहे. त्यातच पुणे शहराच्या जमिनीचा बहुतांश भाग हा बेसॉल्ट खडकाचा असल्याने जमिनीतील खूप कमी अंतरावर हा खडक लागत असून, प्रथमदर्शनी पाया घेण्यासाठी हा खडक योग्य आहे. त्याचे नमूनेही महामेट्रोने संकलित केले असून, ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. त्यात या खडकांची घनता, त्याची मजबुती, पाया सहन करण्याची क्षमता तपासली जाणार असल्याचे दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, पायाभरणीसाठी आवश्यक असलेला खडक अवघ्या तीन ते सहा मीटर अंतरावर असल्याने पायाभरणी आणि खांब उभारणीच्या खर्चात तब्बल ४० टक्क्यांची बचत होण्याची शक्यता आहे. नागपूर शहरात हा खडक जवळपास तीस मीटर खाली आढळून आला. त्यामुळे पायाचे फाउंडेशन उभारण्यासाठी जास्त वेळ लागला तसेच फाउंडेशनचा नियोजित खर्चही वाढला आहे. मात्र, नागपूरच्या उलट स्थिती पुण्यात आहे. पुण्यात कठीण खडक जवळ असल्याने पायाभरणीच्या खर्च कमी होणार असून एका खांबाची उभारणी एका आठवड्यातही करणे शक्य होणार आहे. प्रकल्पाच्या फाउंडेशन उभारणीसाठी एकूण प्रकल्पाच्या २० टक्के खर्च येतो. मात्र, आता या खर्चात खडक जवळच आढळून आल्याने मोठी बचत होणार आहे.

सर्वेक्षणाचे काम १५ दिवसांत पूर्ण
महामेट्रोच्या वतीने पुणे मेट्रोसाठी जमिनीची पोत घेण्याचे काम जोमाने सुरू असून, १५ दिवसांत हा सर्व्हे पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती महामेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यानंतर जमिनीखाली असलेल्या सेवा वाहिन्यांच्या कामाचे सर्वेक्षण हाती घेऊन ते तातडीने पूर्ण केले जाणार आहे.
याबाबत दीक्षित यांनी सांगितले, की पुणे मेट्रो प्रकल्पासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. येत्या पाच महिन्यांत प्रकल्पासाठीचे सर्व सर्वेक्षण, निविदाप्रक्रिया, मेट्रोसाठीचा निधी उभारणीचे करार, प्रत्यक्ष प्रकल्प आराखडा ही कामे एकाच वेळी सम पातळीवर पूर्ण केली जाणार आहेत. प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामास एप्रिलमध्ये सुरुवात होईल.
दरम्यान, पुणे मेट्रोच्या कार्यालयाची औपचारिक सुरुवात आजपासून कोरेगाव पार्क येथील ओरियन या इमारतीमध्ये सुरू करण्यात आली आहे. तसेच मेट्रोची माहिती सोशल मीडिया द्वारे पुणेकरांना मिळावी या उद्देशाने फेसबुक, ट्विटर, तसेच पुणे मेट्रोचे संकेतस्थळ आणि मेट्रोच्या यू-ट्यूब चॅनेलची सुरुवात करण्यात आली. याबाबतची माहिती दीक्षित यांनी दिली.
दीक्षित म्हणाले, की पुणे मेट्रोचे काम करताना मेट्रो प्रकल्पाची माहिती प्रत्येक पुणेकरांना व्हावी तसेच त्यांच्या सूचना आणि त्यांचा सहभागही या प्रकल्पास मिळावा या उद्देशाने मेट्रो सोशल कनेक्ट हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

महामेट्रोची नोंदणी पूर्ण
कंपनी कायद्यानुसार, महामेट्रोची नोंदणी प्रक्रीया पूर्ण झालेली असून प्रत्यक्ष प्रमाणपत्र मिळण्यास १५ जानेवारी पर्यतचा अवधी लागणार आहे. त्यानंतरच महामेट्रोचे प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याचे दिक्षीत यांनी यावेळी दिली. या नोंदणीनुसार नागपूर मेट्रो महामेट्रोत विसर्जित करण्यात आली आली असल्याचेही दिक्षीत यांनी यावेळी बोलतान स्पष्ट केले.

सोशल मीडियाच्या माध्यमातून पुणेकरांशी प्रत्यक्ष संवाद साधला जाईल. त्या अंतर्गत मेट्रोच्या प्रत्येक नवीन कामाचे व्हिडीओ, फोटो, कार्यक्रमांची माहिती दिली जाणार आहे. तसेच मेट्रो प्रकल्प ज्या भागातून जातो, त्या भागातील नागरिकांना ‘मेट्रो मित्र’ म्हणून प्रकल्पाच्या कामात समाविष्ट करून घेतले जाणार आहे.
- ब्रिजेश दीक्षित,
व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

Web Title: Coral reef for underground metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.