कार्नेल युनिव्हर्सिटीचे उद्योगविषयक ‘इनक्युबेशन सेंटर’ मुंबईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:08 AM2021-01-09T04:08:37+5:302021-01-09T04:08:37+5:30
पुणे : राज्यातील स्टार्टअपच्या व्यावसायिक गुणवत्ता वाढीसाठी अमेरिकेच्या कार्नेल युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या विद्यापीठाचे उद्योगविषयक ‘इनक्युबेशन ...
पुणे : राज्यातील स्टार्टअपच्या व्यावसायिक गुणवत्ता वाढीसाठी अमेरिकेच्या कार्नेल युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या विद्यापीठाचे उद्योगविषयक ‘इनक्युबेशन सेंटर’ मार्च-एप्रिलपर्यंत मुंबईत सुरू केले जाणार आहे. या ठिकाणी प्रशिक्षणासोबतच व्हेंचर कॅपिटल फंड देण्याचीही सुविधा निर्माण केली जाणार आहे. असा प्रयोग करणारे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य ठरणार असल्याची माहिती उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली.
महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा कक्षाच्या (मैत्री) पुणे विभागाच्या व्हर्च्युअल सुविधा कक्षाचे उद्घाटन डॉ. कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. कांबळे म्हणाले, राज्यातील नवीन स्टार्ट अपसाठी राज्याचे स्वतंत्र धोरण ठरलेले असून आतापर्यंत चार हजार स्टार्ट अप सुरु झाले आहेत. कार्नेल विद्यापीठासोबत सुरु केल्या जाणाऱ्या सेंटरमध्ये फक्त महाराष्ट्रातीलच ६० ते ७० स्टार्टअपला प्रवेश दिला जाणार असून यामध्ये ३० टक्के जागा महिला उद्योजकांसाठी राखीव असणार आहेत. या सर्वांचे शुल्क शासनाचा उद्योग विभाग भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
=====
आतापर्यंत मुख्यमंत्री रोजगार योजनेमधून पाच हजार युनिट मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेला राज्यातील नवउद्योजकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. व्यावसायिक कर्ज उपलब्ध करुन देण्याकरिता जिल्हास्तरावर तसेच राज्यस्तरावर विविध बँकांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्यात येत असून त्यांनाही अधिकाधिक प्रकरणे मंजूर करण्याच्या सूचना केल्या जात असल्याचे कांबळे यांनी सांगितले.