उरुळी कांचनमध्ये कोरोना लसीकरणाचा उडाला बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:08 AM2021-07-18T04:08:19+5:302021-07-18T04:08:19+5:30
सरपंच संतोष कांचन (पप्पू) यांनी सांगितले की, ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य केंद्राला सर्व सहकार्य करीत असते; पण नियोजनशून्य कामामुळे तेथे ...
सरपंच संतोष कांचन (पप्पू) यांनी सांगितले की, ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य केंद्राला सर्व सहकार्य करीत असते; पण नियोजनशून्य कामामुळे तेथे गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता जास्त वाटते. गावचे लसीकरण पूर्ण करण्याची जबाबदारी सरपंचाची आहे, पण आरोग्य विभागाचे सहकार्य मिळाले नाही तर ते अशक्य आहे. मग तो दोष सरपंचाचा नाही.
उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पहाटे चारपासूनच नागरिकांच्या रांगा लागतात, मात्र आरोग्य खात्याचे कर्मचारी उशिरा येऊन नियोजन करत बसतात. नागरिक उपाशी पोटी लसीकरण केंद्रावर ताटकळत बसतात व शेवटी नऊ वाजता त्यांना कळते की फक्त शंभर लोकांनाच लस टोचली जाणार आहे. यामुळे तीनशे-साडेतीनशे लोक लाईनमध्ये उभे असतानाही फक्त शंभर लोकांना लसीकरण होण्याने अडीचशे ते तीनशे लोकांची गैरसोय होत आहे. नियोजन नसल्याने ही मंडळी अडचणीत येऊन व हेलपाट्यांच्या चक्रात सकाळी चार ते दहा वाजेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रात अडकून पडतात. यातून वयस्कर मंडळीदेखील सुटत नाहीत तर विशेष म्हणजे लाईनमधील गर्दीमुळे मूळ कोरोना प्रादुर्भाव नसतानाही कोरोना प्रादुर्भाव घरी घेऊन जाण्याची वेळ त्यांच्यावर येते की काय, अशी शंका येत आहे. कारण लसीकरणाच्या लाईनमध्ये उभे राहिलेले लोकांकडून कोणताही नियम पाळला जात नाही किंवा तो पाळावा म्हणून प्रशासन लक्ष देताना दिसत नाही.
याच्यासाठी जिल्हा कार्यालयाकडून लोकसंख्येवर आधारित लसीकरण करण्यासाठी लसीचा पुरवठा होणे गरजेचे असताना अधिकारीवर्ग उरुळी कांचनसारख्या ७० हजारांच्या पुढे लोकसंख्या गेलेल्या गावाला केवळ शंभर ते दीडशे जणांना पुरेल एवढी लस देतात व नागरिकांची चेष्टा करतात, ही बाब जिल्हा प्रशासनाने ध्यानात घेऊन गोरगरीब जनतेची होणारी अडवणूक व पिळवणूक थांबवण्याची मागणी उरुळी कांचन परिसरातील नागरिक करीत आहेत.
उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता कदम यांनी सांगितले की, आमच्याकडे होणारा लसीचा पुरवठा आठवड्यातून तीन ते चार दिवस होत नाही आणि झाला तर फार थोड्या प्रमाणात होतो. त्यामुळे नियोजन करताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. तरी वरिष्ठ कार्यालयाने या गोष्टीची योग्य ती दखल घेऊन ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना त्यांच्या मागणीप्रमाणे व लोकसंख्येवर आधारित लसीचा पुरवठा करावा म्हणजे गावपातळीवरील लसीकरण प्रामुख्याने पूर्ण करून पुढील संभाव्य धोका टाळणे शक्य होईल.