Corona Virus : खेडमध्ये एकाच शाळेतील 5 शिक्षक पॉझिटिव्ह; प्रशासन चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 08:30 PM2022-01-05T20:30:09+5:302022-01-05T21:52:47+5:30
या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळेतील सर्व शिक्षकांच्या अँटिजेन टेस्ट आज बुधवार ५ जानेवारी रोजी करण्यात आल्या. त्यामध्ये तब्बल चार शिक्षकांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी - जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील फुरुस येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवणाऱ्या पाच शिक्षकांची अँटिजेन चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे तालुका प्रशासनाची चिंता वाढली आहे. तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख कमी आला होता. मात्र, गेल्या 2 दिवसांपासून ही रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या शाळेतील एक शिक्षिका आजारी असल्याने तिची दोन दिवसांपूर्वी आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली होती. मात्र, या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळेतील सर्व शिक्षकांच्या अँटिजेन टेस्ट आज बुधवार ५ जानेवारी रोजी करण्यात आल्या. त्यामध्ये तब्बल चार शिक्षकांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
तालुका आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील वावे, लोटे, कोरेगाव व फुरुस या चार गावातील एकूण २५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या दोन महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख कमी आला होता. मात्र गेल्या दोन दिवसात रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.