खेड तालुक्यात कोरोनाबधित महिलेने केला खासगी वाहनाने प्रवास, माहिती मिळताच प्रशासनाकडून क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 05:00 PM2020-05-22T17:00:57+5:302020-05-22T17:02:21+5:30
कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने संबंधित महिलेवर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
राजगुरुनगर: खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथे ५ दिवसापूर्वी एकाच दिवशी ४ जणांचे कोरोना रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले होते. त्यातील एका महिला डिस्चार्ज रुग्णालयाने डिस्चार्ज दिल्यावर खेड प्रशासनाला कुठलीही माहिती न देता गुरुवारी (दि. २१)रात्री ९ वाजता खासगी वाहनाने राक्षेवाडी येथे तिच्या घरी आली होती. मात्र, प्रशासनाला या घटनेची माहिती समजताच तात्काळ त्या महिलेला पुन्हा पुण्यातील एका रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे.
पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राक्षेवाडी (ता. खेड) येथील व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्यानंतर या कुटुंबातील आणखी चार जणांना कोरोनाची लागण झाली. त्यात बाधित व्यक्तीची पत्नी,शेजारी राहत असलेला बहिणीचा पती , बहिणीचा मुलगा(भाचा) आणि सासु यांचा समावेश आहे. यामुळे या कुटुंबात एकुण पाच जण बाधित झाल्याचे स्पष्ट झाले होते.पती व महिला यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या रुग्णालयाने या महिलेला २१ मे च्या रात्री खासगी वाहनाने खेड प्रशासनाला कुठलीही माहिती न देता आणण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली होती. मात्र पुन्हा प्रशासनाने संबधित रुग्णालयाशी संर्पक केला होता. पहाटे ३ वाजता त्या महिलेला पुन्हा त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या महिलेच्या पतीला याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.तो दिवसाआड पुण्यात जाऊन येऊन करीत होता. त्याचा थेट संपर्क आला म्हणुन कुटुंबातील पत्नी, मेहुणा ,त्याची पत्नी,सासु,सासरा व भाचा आणि त्याची दोन लहान मुले यांसह बाधित व्यक्तीवर उपचार करणारे परिसरातील डॉक्टर, नर्स,इतर एक असे ११ जण 'हाय रिस्क' म्हणुन तपासणीसाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल आले होते. त्यातील डॉक्टर, नर्स, दोन मुले इतर एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. कुटुंबातील चार जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते.यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची तब्येत ठणठणीत असली तरी त्यांना क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे. राक्षेवाडी हा परिसर सील करण्यात आला आहे. तसेच कन्टेंमेन्ट झोन म्हणून प्रशासनाने जाहिर केला आहे.मात्र, पाच दिवसात महिलेला डिस्चार्ज कसा काय मिळाला याबाबत ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत असुन पुन्हा भीतीदायक वातावरण परिसरात सुरू झाले असल्याचे राक्षेवाडीचे पोलिस पाटील पप्पू काका राक्षे यांनी सांगितले.
............................................................
या महिलेच्या पतीच्या रिपोर्ट तारखेला पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या पत्नीला दि १५ मे रोजी तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांचा हा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र तिथे स्टाफ नसल्याने तसेच या कोरोनाग्रस्त महिलेची लक्षणे कमी झाल्यामुळे खेड प्रशासनाला कुठलीही माहिती न देता त्या महिलेला पुण्यातुन राक्षेवाडीत खासगी वाहनाने पाठविले होते.डॉ.बळीराम गाढवे, तालुका वैदयकीय अधिकारी, खेड )