कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे कोरोनापासून दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:11 AM2021-04-22T04:11:54+5:302021-04-22T04:11:54+5:30
पुणे : कोरोना मृतदेहापासून किंवा त्यांच्या अस्थींपासून कोरोनाचा संसर्ग होतो का? अशा शंका आजही नागरिकांच्या मनामध्ये आहेत. परंतु, मागील ...
पुणे : कोरोना मृतदेहापासून किंवा त्यांच्या अस्थींपासून कोरोनाचा संसर्ग होतो का? अशा शंका आजही नागरिकांच्या मनामध्ये आहेत. परंतु, मागील वर्षभरापासून कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या महापालिकेच्या सेवकांनी या समजुतीला फाटा दिला आहे. पालिकेच्या विविध स्मशानभूमीमध्ये जवळपास सव्वाशे कर्मचारी काम करतात. यातील एकाही कर्मचाऱ्याला आजवर कोरोनाची लागण झाली नसल्याची माहिती विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी दिली.
मागील वर्षी शहरामध्ये राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण ९ मार्च रोजी आढळून आला. त्यानंतर ३० एप्रिल रोजी कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत गेले. शहरात आजमितीस सव्वा सहा हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सुरुवातीच्या काळात कोणीही पुढे येत नव्हते. नातेवाइकांकडून महापालिकेला अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली जात होती. महापालिकेने मृतदेह व्यवस्थापन व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली. याकाळात काही संस्थाही अंत्यविधीसाठी पुढे आल्या. पालिकेच्या दहा स्मशानभूमीमध्ये विद्युत आणि गॅस दाहिन्यांमध्ये अंत्यविधी केला जात होता. मृतांचा आकडा वाढल्यानंतर काही स्मशानभूमीमध्ये पारंपरिक पद्धतीने लाकडावर अंत्यविधी करण्यास मुभा देण्यात आली. दरम्यान, ऑक्टोबरपासून पहिली लाट ओसरत गेली. त्यामुळे मृतांचा आकडाही खाली गेला. मात्र फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला प्रारंभ झाला. मार्च आणि एप्रिलमध्ये मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या मृतदेहांवर पालिकेच्या विविध स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जातात. रुग्णालयांकडून पालिकेला मृतदेह सुपूर्द केले जातात.
अंत्यसंस्कारांसाठी पालिकेकडील बारा आणि कंत्राटी पद्धतीने नेमलेले ११८ ऑपरेटर काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांपैकी ज्या कर्मचाऱ्यांना मृतदेहांच्या अंत्यविधीची ड्युटी लावलेली आहे; त्यापैकी एकालाही अद्याप लागण झालेली नाही. मृतदेह जवळून हाताळत असतानाही हे कर्मचारी संसर्गापासून लांब राहिलेले आहेत.
-----
महापालिकेकडून दिले जाणारे पीपीई किट, हॅन्ड ग्लोव्ह्ज, मास्क, सॅनिटायझर अशा सुरक्षा साधनांचा वापर कर्मचारी व्यवस्थित करीत आहेत. यासोबतच रुग्णालयांमधून मृतदेह अंत्यविधीसाठी दिला जात असताना तो पूर्णपणे सॅनिटाईज करून दिला जातो. कर्मचाऱ्यांकडून बाळगली जाणारी खबरदारी आणि नियमांचे पालन यामुळे अंत्यविधी करणारे कर्मचारी कोरोनापासून अद्याप तरी दूर आहेत.
-----