कोरोना काळातील कष्टांचे चीज झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:10 AM2021-01-17T04:10:22+5:302021-01-17T04:10:22+5:30
औैंध जिल्हा रुग्णालय : सर्वांनी सोडला सुटकेचा नि:श्वास लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : औैंध जिल्हा रुग्णालयात ४५ वर्षीय परिचारिका ...
औैंध जिल्हा रुग्णालय : सर्वांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : औैंध जिल्हा रुग्णालयात ४५ वर्षीय परिचारिका वैैशाली कर्डिले यांना पहिली लस देण्यात आली. जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर कोरोना लसीकरण कक्ष तयार करण्यात आला होता. या कक्षात ऑनलाइन कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर लसीकरणास सुरुवात करण्यात आली.
या ऐतिहासिक कोरोना लसीकरण कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, विभागीय संचालक डॉ.संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर आदी उपस्थित होते.
गेले नऊ महिने कोरोनाशी संघर्ष करत असताना आलेले अनुभव यावेळी अनेकांनी व्यक्त केले. कोरोनाची लस आल्यानंतर पुन्हा पहिल्यासारखे दिवस पाहायला मिळतील, असा आशावादही लस घेणाऱ्या व्यक्तींनी व्यक्त केला. रुग्णालयांमध्ये लस घेण्यासाठी दाखल झालेल्या कोरोना योद्ध्यांचे रांगोळी काढून स्वागत करण्यात आले होते. लस घेणाऱ्या व्यक्तींची संपूर्ण माहिती अर्जात भरल्यानंतर नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांना लस दिली जात होती. लस दिल्यानंतर अर्धा तास त्यांच्या प्रकृतीचे निरीक्षण करण्यात आले.
४९ वर्षीय मीरा डोंगरे या परिचारिका म्हणाल्या, ‘लस घेतल्याचा आनंद होत आहे. कोरोना कालावधीत प्रत्यक्ष काम करत असताना घेतलेल्या कष्टांची आज एक प्रकारे परतफेड होत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम लस देण्यात येत असल्याने आनंदही होत आहे.’ कोरोना कालावधीत प्रत्यक्ष आयसीयू वॉर्डमध्ये आम्ही सफाईचे काम करत होतो. त्यावेळी मनात भीती असायची, परंतु आता कोरोनाची लस आल्याने आनंद होत आहे, अशा भावना सफाई कामगार शशिकांत वाघमारे यांनी व्यक्त केली.
चौकट
नि:शंक मनाने घेतली लस
‘कोरोना कालावधीत हिरावलेला आनंद परत मिळणार आहे. कोरोना कालावधीत आम्ही सेवा बजावत होतो, याचा अभिमान वाटतो. सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे, ही आनंदाची बाब आहे. कोरोना काळात लोकांमध्ये असलेली भीती जवळून पाहिली, परंतु आता लस आल्याने सर्व सुरळीत होईल, असा विश्वास वाटतो. लस घेतल्यानंतर कोणताही त्रास झाला नाही. अनेक चाचण्यांनंतर लस देण्यात आल्याने मनामध्ये कोणतीही शंका नाही.’
- वैैशाली कर्डिले