कोरोनामुळे प्रथमच सुना सुना झाला बीजसोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:11 AM2021-03-31T04:11:28+5:302021-03-31T04:11:28+5:30
देहूगाव : आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी। सकळा सांगावी विनंती माझी।। वाड वेळ झाला उभा पांडुरंग। वैकुंठा श्रीरंग ...
देहूगाव : आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी।
सकळा सांगावी विनंती माझी।।
वाड वेळ झाला उभा पांडुरंग।
वैकुंठा श्रीरंग बोलावितो।।
अंतकाळी विठो आम्हांसी पावला।
कुडीसहित झाला गुप्त तुका।।
या अभंगाप्रमाणे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत शासनाच्या निर्बंधात ३७३ वा श्री संत तुकाराम महाराजांचा वैकुंठगमन सोहळा श्रीक्षेत्र देहूगाव येथील श्री संत तुकाराम महाराज वैकुंठस्थान मंदिर परिसरात संपन्न झाला.
तुकाराम बीजला प्रतिवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून देहूनगरीत लाखो भाविक उपस्थिती लावत असतात. यंदा मात्र हा सोहळा प्रथमच मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. नेहमीप्रमाणे भाविक नसल्याने गावातील वातावरण हरिनामाच्या गजराशिवाय सुने सुने होते. कोरोनाचे नियम व अटींचे पालन करणे, त्याचप्रमाणे परिसरात लावलेला जमाबंदी व संचारबंदी आदेशाचे पालन करून शासनाच्या निर्मयाचा आदर म्हणून भाविकांसह ग्रामस्थांनी आपापल्या घराघरांतूनच दुपारी १२ वाजता महाराजांच्या प्रयाणाचा अभंग होताच- ‘तुकाराम तुकाराम’च्या नामघोष करीत उपस्थित भाविकांनी नांदुरकीच्या झाडावर तुळशीची पाने व फुलांची उधळण करीत बीजोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
राज्यासह जिल्ह्यात व देहूनगरीत वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी व आरोग्याची काळजी घेण्यासाठी यंदा शासनाने बीजसोहळा संपन्न करण्यावर निर्बंध घालून केवळ ५० लोकांमध्येच हा सोहळा करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे पोलीस व प्रशासनाने परिसरात जमावबंदी व संचारबंदी लागू केली होती व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवल्याने गावात शुकशुकाट दिसत होता. देहूनगरीत येणाऱ्या सर्व मार्गांवर पोलिसांनी नाकाबंदी केली होती.
भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताह, चिपळ्या, वीणा, टाळमृदंगाचे निनाद, हरिनामाच्या जयघोषाने भक्तिमय रसात चिंब होणारा परिसर शांत दिसत होता. बंडातात्या कराडकर यांनी बीजोत्सवासाठी देहूत भाविकांनी यावे, असे आवाहन केल्याने गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांचा बंदोबस्त तैनात असल्याने परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त होते.
फोटो- श्री संत तुकाराम महाराजांचा वैकुंठगमन सोहळा श्रीक्षेत्र देहूगाव येथील श्री संत तुकाराम महाराज वैकुंठस्थान मंदिरात झाला. मंदिरातून वैकुंठ मंदिराकडे जाण्यासाठी महाद्वारातून बाहेर आली.