कोरोनामुळे ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाईला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:09 AM2021-07-02T04:09:29+5:302021-07-02T04:09:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यावर गेल्या वर्षी मार्च महिन्यात देशभरात लॉकडाऊन सुरू झाला. वाहनचालकांनी ...

Corona 'breaks' drink and drive | कोरोनामुळे ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाईला ‘ब्रेक’

कोरोनामुळे ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाईला ‘ब्रेक’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यावर गेल्या वर्षी मार्च महिन्यात देशभरात लॉकडाऊन सुरू झाला. वाहनचालकांनी मद्यपान केले आहे का, हे तपासण्यासाठी ब्रिथ ॲनालायझरचा वापर केला जात होता. मात्र, या ब्रिथ ॲनालायझरमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ही चाचणी थांबविण्यात आली. त्यामुळे नियमित होणारी ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई थंडावली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरअखेरीस काही दिवस कारवाई करण्यात आली होती.

लॉकडाऊनच्या कालावधीत सुरुवातीला वाईन शॉप उघडले, तरी बिअर बार, रेस्टॉरंट उघडण्यात आली नव्हती. त्यामुळे बिअर बार, रेस्टॉरंटमध्ये जाऊन मद्यपान करणाऱ्यांची अडचणी झाली होती. त्यावेळी रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या भुर्जीच्या गाड्या बंद झाल्यावर तेथे दारू पिऊन घरी जाणाऱ्यांचे प्रमाण जवळपास बंद झाले होते. काही काळाने रेस्टॉरंट, बार सुरू झाले तरी त्यांची वेळ रात्री १०पर्यंतच असल्याने दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने खूपच कमी झाले आहे.

संचारबंदी असल्याने रात्रीची रस्त्यावरील वाहनांची संख्याही खूप कमी झाली आहे. अशात ब्रिथ ॲनालायझरची तपासणी बंद आणि मास्क यामुळे मद्यपान करुन वाहन चालवत आहे का, ओळखणे वाहतूक पोलिसांना अवघड झाले. त्यामुळे सध्या मद्यपी वाहनचालकांवर कारवाई होताना दिसत नाही. कोणी रस्त्यात गोंधळ घालत असेल व त्याच्या वर्तनावरून तो दारू पिला असल्याचे समजल्यावरच पोलीस त्याची वैद्यकीय तपासणी करून कारवाई करत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरच्या शेवटच्या काही दिवसांत पोलिसांनी मोठी कारवाई राबवून अशा मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली होती. गेल्या ५ महिन्यांत तर केवळ ६२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

मद्यपी वाहनचालकांवर झालेली कारवाई

२०१९ - १४६०३

२०२० - २०१७

मे २०२१ अखेर - ६२

Web Title: Corona 'breaks' drink and drive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.