आशा सेविकांच्या सर्वेक्षणामुळे कोरोनाला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:08 AM2021-06-05T04:08:07+5:302021-06-05T04:08:07+5:30
लोकमत न्यूज नेटकर्व पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना साखळी तोडण्यात आशा स्वयंसेविकांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांनी घरोघरी जाऊन ...
लोकमत न्यूज नेटकर्व
पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना साखळी तोडण्यात आशा स्वयंसेविकांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांनी घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणामुळे अनेक बाधित लवकर शोधून त्यांना उपचार देण्यास आरोग्य विभागाला यश येत आहे. मागील पंधरा दिवसांत आशा स्वयंसेविकांनी ४१ लाख ३२ हजार ६० व्यक्तींची भेट घेऊन त्यांच्या आरोग्याची माहिती आणि तपासणी केली. त्यामध्ये आजारी व संशयित व्यक्तींची तपासणी केली असता, ८०६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कोरोना साखळी ब्रेक करण्यात प्रशासनाला काहीसे यश मिळत आहे.
जनगणना असो की आरोग्य विभागाशी संदर्भित कोणतेही सर्वेक्षण हे आशा स्वयंसेविकांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. त्याचप्रमाणे कोरोनाकाळातही स्वयंसेविका स्वतःचा जीव धोक्यात घालून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. बाधितांचे तत्काळ निदान झाले तर त्याला उपचार मिळण्यास मदत होईल आणि पुढील धोका टळू शकतो. एवढंच नव्हे तर संसर्गाची साखळी ब्रेक होते. त्या पार्श्वभूमीवर मागील एक वर्षापासून या स्वयंसेविका सर्वेक्षण करत आहेत.
आतापर्यंत सर्वेक्षणाच्या एकूण सात फेऱ्या झाल्या. या सातव्या फेरीमध्ये तब्बल ९ लाख १६ हजार ३८७ कुटुंबांतील ४४ लाख २९ हजार ४६ व्यक्तींना भेट दिली. त्यामध्ये ५१ हजार ७३० व्यक्ती संशयित आढळून आल्या. त्यांची नमुने तपासणी केली असता, ६ हजार ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
दरम्यान, मागील पंधरा दिवसांत केलेल्या सर्वेक्षणात ८०६ बाधित सापडले. फिव्हर क्लिनिकमध्ये ५६ हजार ७५ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४ हजार २५३ संशयितांची नमुने तपासणी केली असता, ७०५ बाधित सापडले. तर, सुपरस्प्रेडर सर्वेक्षणामध्ये २७ हजार ६६३ व्यक्तींपैकी ५ हजार ८६२ संशयितांची नमुने तपासणी केली. त्यामध्ये ५६९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या तीन वेगवेगळ्या सर्वेक्षणामध्ये पंधरा दिवसांत दोन हजारांहून अधिक बाधित सापडले.