रात्री पावणे तीनला त्या कोरोना कॅब चालकाला नायडू हाॅस्पिटलमध्ये दाखल केला आणि सुटकेचा निश्वास टाकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:14 AM2021-03-09T04:14:45+5:302021-03-09T04:14:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील आणि राज्यातील पहिला कोरोना रुग्ण सिंहगड रोड येथे सापडला. दुबईहून आलेल्या या कोरोना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील आणि राज्यातील पहिला कोरोना रुग्ण सिंहगड रोड येथे सापडला. दुबईहून आलेल्या या कोरोना पॉझिटिव्ह कुटुंबाला मुंबई विमानतळावरून पुण्यात घेऊन येणारा कॅब चालक प्रशासनाचा मोठा चिंतेत विषय होता. या कॅब चालकाला शोधून, हातापाया पडून व अखेर पोलीस कारवाईची धमकी देऊन मांजरी येथून रात्री पावणे तीन वाजता नायडू हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. हडपसरचे मंडळ अधिकारी व्यंकटेश रामचंद्र चिरमुल्ला यांनी जिवाची पर्वा न करता हे काम केले आणि पुढील मोठा अनर्थ टाळला.
या आपल्या अनुभवाबाबत चिरमुल्ला यांनी सांगितले की, रात्री 11.30 वाजता हवेली प्रांत अधिकारी सचिन बारावकर यांचा फोन आला. पुण्यातील पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह कुटुंबाला मुंबई विमानतळावरून घेऊन आलेल्या कॅब चालकाला तातडीने नायडू हाॅस्पिटलमध्ये दाखल करारचे, त्याचा मोबाईल नंबर आणि लोकेशन शेअर्स केले आहे. 9 मार्च होळीचा दिवस असल्याने जेवण करून झोपण्याच्या तयारीत होतो. परंतु साहेबांचा फोन आल्यावर लगेच तयारी केली. कोरोना रुग्णांच्या घरी चाललोय म्हटल्यावर घरातील लोकांनी विरोध केला. पण साहेबाचा फोन आहे, जावेच लागेल, असे सांगत मांजरी गाठली. दरम्यान औंध जिल्हा रुग्णालयाची रूग्णवाहिका व दोन डाॅक्टर देखील हजर झाले. डाॅक्टर पूर्णपणे पीपीए किट घालून खबरदारी घेऊन आले होते. आणि मी साधा ड्रेस घालून, मास्क, हॅण्डग्लोज न घालताच पोहचलो होते. डाॅक्टरांनी किमान एन 95 मास्क आणि हॅण्डग्लोज घालण्यास सांगितले. जवळच्याच एका मेडिकलमधून 250 रुपये देऊन मास्क खरेदी केला. पण मनात प्रचंड भीती होती.
दरम्यान त्या कॅब चालकाला फोन करून संपर्क केला. कलेक्टर ऑफिसमधून आलो आहे आम्हाला पाच मिनिट भेटण्याची विनंती केली. परंतु तो कॅब चालक मी मुंबईला गेलोच नाही, माझी गाडीच नाही आणि मला काही ही त्रास होत नाही, असे सांगत टाळाटाळ करत होता. अखेर रात्री 1.30 वजता मांजरी येथील शाळेत भेटण्यास आला. त्यानंतर बारवकर साहेबांनी पाठवलेल्या माहितीची नाव, गाडी नंबर, फोन नंबर त्याच व्यक्तीचे असल्याची खात्री पटली. पण काही केल्या तो कॅब चालक आमच्या सोबत येण्यास तयार होईना. मला काही होत नाही, मी येणार नाही. यामध्ये रात्रीचे दोन वाजले. दोन वाजता बारावकर यांनी फोन केला तो काही हाॅस्पिटलमध्ये येण्यास तयार नाही. परंतु विभागीय आयुक्त यांचे आदेश असून, त्याला नायडूत दाखल कराच, असे सांगितले.
त्या कॅब चालकाला नंतर पोलिसात तक्रार दाखल करून आत टाकले जाईल व तुझ्या घरच्या लोकांना पण त्रास होईल, असे सांगितल्यावर तो तयार झाला, पण मी रुग्णवाहिकेत बसणार नाही माझ्या गाडीतून येईल. त्यानंतर पुढे रुग्णवाहिका, त्या कॅब चालकाची गाडी आणि मागे माझी गाडी होती. रात्री पावणे तीन वाजता त्या कॅब चालकाला नायडू हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. स्वॅब टेस्टमध्ये तो कॅब चालक पाॅझिटिव्ह आला.
--------
फाेटो -
मांजरी येथील कॅब चालकाला आणण्यासाठी हडपसरचे मंडळ अधिकारी व्यंकटेश रामचंद्र चिरमुल्ला आणि डॉक्टर