पुणे महापालिकेचे 'कोरोना कॉल सेंटर' आता २४ तास उपलब्ध राहणार : महापौर मुरलीधर मोहोळ यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 06:03 PM2021-03-31T18:03:33+5:302021-03-31T18:03:42+5:30

बेड्सची उपलब्धता जाणून घेण्यास मदत होणार; हेल्पलाईन क्रमांकाची संख्या दुप्पट

Corona call center now 24 hours in Pune: Important announcement of Mayor Murlidhar Mohol | पुणे महापालिकेचे 'कोरोना कॉल सेंटर' आता २४ तास उपलब्ध राहणार : महापौर मुरलीधर मोहोळ यांची घोषणा

पुणे महापालिकेचे 'कोरोना कॉल सेंटर' आता २४ तास उपलब्ध राहणार : महापौर मुरलीधर मोहोळ यांची घोषणा

Next

पुणे: पुण्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना पुणे महापालिकेच्या हेल्पलाईन क्रमांकावरून बेड्स किंवा इतर वैद्यकीय उपचारासबंधी माहिती मिळण्यात अडचणी येत होत्या. यावरून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे  तक्रारींचा ओघ देखील मोठ्या प्रमाणात वाढला होता. मात्र याच दरम्यान महापालिकेकडून एक दिलासा देणारी बातमी आहे. कोरोना संबंधीची माहिती उपलब्ध व्हावी म्हणून 24 तास हेल्पलाईन सेवा सुरू राहणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

पुणे शहरातील कोरोना कॉल सेंटरचा आढावा महापौर  मुरलीधर मोहोळ यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, प्रवीण चोरबेले, आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पुणे शहरात रात्री-अपरात्री कोरोना उपचारासाठी बेड्स उपलब्धतेची माहिती मिळावी या हेतूने कॉल सेंटरचे विस्तारीकरण करण्यात आले आहे.  हे कॉल सेंटर २४ तास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेऊन यातील हेल्पलाईन क्रमांकाची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. यात आधी ५ हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध होते, ते आता दहापर्यंत वाढवण्यात येत आहेत. त्यामुळे कॉल कनेक्ट होण्यास अडचण निर्माण होणार नाही', असेही मोहोळ म्हणाले. 

महानगरपालिका ५ हजार सीसीसी बेड्स तयार करणार

शहरातील ८० टक्के बेड्स ताब्यात घेतल्यानंतर जवळपास ७००० हजार बेड्स कोविडसाठी उपलब्ध होणार आहेत. शिवाय महापालिकेने सीसीसीचे ५ हजार बेड्स तयार करण्याचे नियोजन केले असून पैकी १ हजार २५० बेड्स उपलब्ध झाले आहेत. शिवाय १ हजार ४५० बेड्सची तयारी सुरु आहे असेही महापौर मोहोळ यांनी यावेळी सांगितले.

डॅश बोर्ड अद्ययावत ठेवणे आणि गरजूंना कमीत कमी वेळेत बेड उपलब्ध करुन देण्यासंदर्भात महापौर मोहोळ यांनी प्रशासनाला सूचना केल्या. शिवाय लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून व्यापकता आणण्यासाठी प्रयत्नशील राहण्यासही महापौरांनी सांगितले आहे.

Web Title: Corona call center now 24 hours in Pune: Important announcement of Mayor Murlidhar Mohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.