कोरोना हे चीनचेच षडयंत्र, तिसरे महायुद्ध म्हणूनच लढावे लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:11 AM2021-05-23T04:11:07+5:302021-05-23T04:11:07+5:30
पुणे : कोरोना विषाणूचा प्रसार हे चीनचेच षडयंत्र आहे. त्यामुळे भारताने हे तिसरे महायुद्ध म्हणूनच लढायला हवे. यासाठी देशभर ...
पुणे : कोरोना विषाणूचा प्रसार हे चीनचेच षडयंत्र आहे. त्यामुळे भारताने हे तिसरे महायुद्ध म्हणूनच लढायला हवे. यासाठी देशभर मजबूत आरोग्य यंत्रणा उभी करतानाच संपूर्ण देशाचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया यांनी केले आहे.
फिरोदिया म्हणाले की, कोणाला ही कॉन्स्पिरसी थेअरी वाटेल, परंतु कोविड-१९ विषाणू हा चीनच्या प्रयोगशाळेतच तयार झाला आहे याबाबत माझ्या मनात शंका नाही. वुहान येथील प्रयोगशाळेत चीनने हा विषाणू तयार केला आणि त्याबरोबरच त्याविरुध्दची लसही विकसित केली. जगातून यावर काय प्रतिक्रिया येते याचा अंदाज घेतला. परंतु, भारतासह जगातील इतर देशांनी चीनबरोबरचा व्यापार सुरूच ठेवला. चीनमधील गुंतवणूक येत राहिली. जगाचा हा कचखाऊ प्रतिसाद पाहून चीनचे धाडस वाढले. त्यामुळे त्यांनी विषाणूचा दुसरा व्हेरिएंट तयार केला. त्यालाच आता भारतीय व्हेरिएंट म्हटले जाऊ लागले आहे. हा विषाणू पहिल्यापेक्षा जास्त वेगाने पसरला. आता त्यांनी तिसरा व्हेरिएंट बनविला आहे. लहान मुलांसाठी तो घातक ठरणार आहे.
जगातील कोट्यवधी लोक या विषाणूने मृत्युमुखी पडत असतानाही कोणत्याही देशाचे धाडस नाही की चीनसोबतचा व्यापार बंद करावा किंवा कमी करावा. पाश्चिमात्य देश हे करणार नाहीत कारण ते आपल्या संपूर्ण लोकसंख्येचे वर्षानुवर्षे सातत्याने लसीकरण करू शकतील. पण भारतासारख्या देशाचे काय? असा सवाल करून फिरोदिया म्हणाले की, एकट्या महाराष्ट्राची लोकसंख्या ही ब्रिटन आणि फ्रान्सच्या एकत्रित लोकसंख्येइतकी आहे. त्यामुळेच आपण हा धोका ओळखला पाहिजे. जणू हे तिसरे महायुद्ध आहे त्याप्रमाणे लढा दिला पाहिजे. यासाठी सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम बंद करण्याची गरज आहे. प्रत्येक राज्यात लसींचे उत्पादन प्रकल्प उभे केले पाहिजे. त्याचबारोबर व्हायरसच्या जिनोम सिक्वेन्सिंगवर संशोधन करायला हवे. त्यातून सर्व प्रकारच्या व्हेरिएंटवर लस विकसित करता येईल. त्याबरोबर आरोग्य व्यवस्था बळकट आणि सार्वत्रिक करायला हवी. सरकारी रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सचे वेतन वाढविले पाहिजे. महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये कोरानाविरुध्दच्या लढाईची यंत्रणा उभारली पाहिजे. विषाणू प्रादुर्भाव झाल्यावर त्याला त्याच ठिकाणी रोखण्याची यंत्रणा तयार करायला हवी.