कोरोना मुळे पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बंद; जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 01:22 PM2021-06-16T13:22:12+5:302021-06-16T14:17:32+5:30
पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक आणि जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा निर्णय
पुणे: पुणे शहरातली रुग्णसंख्या आटोक्यात आली असली तरी ग्रामीण भागात मात्र अजून कोरोना रुग्ण सापडत आहेत. हे लक्षात घेता जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जायला आता जिल्ह्याबाहेरील नागरिकांना बंदी असणार आहे. पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद आणि पोलिस अधिक्षक डॅा. अभिनव देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात नयनरम्य अशी पर्यटने स्थळे आहेत. पावसाळ्यात दंड किल्ल्यांसह या पर्यटन स्थळांवर पर्यटक गर्दी करत असतात. पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलीस आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने काही बंधने घालण्यात आली आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे पुणे जिल्ह्याबाहेरील नागरिकांना पुण्यातील पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे.
“पुण्यातील पर्यटन स्थळांची यादी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवली आहे.
पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश काढण्यात येणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पोलीस सुरक्षा आणि बॅरिकेड लावण्यात येणार आहेत. पुणे खोपोली आणि पुणे तळेगाव हायवे च्या टोलनाक्यावर फ्लेक्स लावण्यात येणार आहेत. त्याठिकाणी पर्यटन स्थळांवर गर्दी टाळण्याच्या हेतूने बंदी घालण्यात आली आहे अशी सूचना लावण्यात येणार आहेत” असे प्रसाद म्हणाले.
स्थानिकांना परवानगी
जिल्ह्यातील अनेक भागात बाहेरून नागरिक पर्यटनाला येत असतात. पण कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर बाहेरील नागरिकांना परवानगी नसणार आहे. त्यानुसार चेक पोस्ट वर पोलीस बंदोबस्त असणार आहे. ग्रामीण भागात स्थानिक नागरिकांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्या भागात आरोग्य सुविधाही अत्यल्प आहेत. त्यांचा कोरोनापासून बचाव होणे गरजेचे आहे. बाहेरील नागरिक त्यांच्या संपर्कात येऊन कोरोनाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून नियमांचे पालन करावे असे आव्हान प्रशासनाने केले आहे.