कोरोना संकटात ग्रामीण रुग्णालयाची इमारत धूळ खात पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:09 AM2021-04-22T04:09:19+5:302021-04-22T04:09:19+5:30
ग्रामस्थांचा जीव टांगणीला ग्रामस्थांचा ठिय्या आंदोलनाचा इशारा बावडा : सध्या गाव व परिसरात कोरोनाच्या महामारीने जनजीवन ...
ग्रामस्थांचा जीव टांगणीला
ग्रामस्थांचा ठिय्या आंदोलनाचा इशारा
बावडा : सध्या गाव व परिसरात कोरोनाच्या महामारीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील रुग्णांची गावातच सोय होईल असे सुसज्ज रुग्णालय बांधून तयार आहे. परंतु राजकारणामुळे कोरोना संकटात कोट्यवधी रुपयांची इमारत गेल्या तीन वर्षांपासून धूळ खात पडून आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे. हे रुग्णालय तातडीने चालू करून या ठिकाणी कोविड सेंटर उभारावे, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.
त्वरित रुग्णालय चालू करा, अन्यथा ठिय्या आंदोलन करू, असा इशारा येथील ग्रामपंचायत सदस्य सारिका शीतल कांबळे, अमोल भोसले, भैया जाधव, पँथरचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड आदींनी दिला आहे.
बावडा व परिसरातील ग्रामस्थांसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी २०१४ साली विशेष बाब म्हणून ग्रामीण रुग्णालय मंजूर करून तातडीने त्याचे काम चालू केले. आज ही इमारत सुसज्ज स्थितीत गेल्या तीन वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. याकडे शासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. राज्यात शासनाने निर्बंध कडक करून संचारबंदी जारी केली आहे. तर बावडा गावात कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला असून, अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. तर पॉझिटिव्हची संख्याही लक्षणीय वाढली आहे. गावात कुठेही उपचाराची सोय नसून अकलूज शहरातील रुग्णालय ही अशा रुग्णांनी भरगच्च भरले आहे. त्यामुळे शासनाने त्या इमारतीमध्ये त्वरित कोविड सेंटर सुरू करावे; अन्यथा रुग्णालयासमोरच कोरोना नियमांचे पालन करीत मोजके कार्यकर्ते ठिय्या आंदोलन करणार असल्याचे शीतल कांबळे यांनी पत्रकारांना सांगितले. इंदापूरचे उपअभियंता धनंजय वैद्य यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
ग्रामीण रुग्णालयाची इमारत बांधून तयार असल्याने गावात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जिल्हा परिषदेकडूनही काणाडोळा होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज असताना एकाच अधिकाऱ्यांवर भागवले जाते. तसेच ग्रामीण रुग्णालय इमारत पूर्ण झाल्याने जिल्हा परिषदेकडून दुर्लक्ष केला जात नाही.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत २५ ते ३० गावांचा भार आणि कर्मचारी अपुरे त्यामुळे अचानक रुग्ण वाढल्यास कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होते. पण जिल्हा परिषदकडून सांगण्यात येते की ग्रामीण रुग्णालय चालू होणार असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात काही सुधारणा करता येत नाहीत. तर ग्रामीण रुग्णालय चालू होण्यास मुहूर्त कधी मिळणार आणि लोकांना याचा फायदा कधी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राजकीय वादात सापडले ग्रामीण रुग्णालय...
बावडा (ता. इंदापूर) येथील उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन राजकीय वादात तर अडकले नाही ना? अशी नागरिकांमध्ये चर्चा रंगत आहे. कारण रुग्णालयाची मंजुरी, भूमिपूजन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून झाले. त्यानंतर यातील आतल्या इमारतीचे भूमिपूजन सध्याचे राज्यमंत्री व तत्कालीन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले होते. त्याचबरोबर पाटील गेल्या दोन निवडणुकीत पराभूत झाल्याने त्यांचेकडे सत्ता नाही. आणि सध्या दत्तात्रय भरणे मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे उद्घाटन नेमके कुणी करायचे ? या वादात तर इमारत धूळ खात पडली नाही ना, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे.
बावडा (ता. इंदापूर) येथे बांधण्यात आलेली कोट्यवधी रुपयांची इमारत तीन वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धूळ खात पडून आहे.
२१०४२०२१-बारामती-११