आषाढी वारीवर कोरोनाचे संकट; संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात १२ जण कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 06:40 PM2022-06-29T18:40:41+5:302022-06-29T18:41:00+5:30
वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येच्या पार्श्वभुमीवर बारामतीत आरोग्य प्रशासन दक्ष झाले आहे
बारामती : वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येच्या पार्श्वभुमीवर बारामतीत आरोग्य प्रशासन दक्ष झाले आहे. आरोग्य विभागाने श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात बुधवारी(दि २९) रॅपिड एंटीजन टेस्ट केली. यावेळी एकाच दिवशी बारा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
१२ कोरोना बाधितांपैकी एकही रुग्ण बारामती परिसरातील नसल्याचे देखील प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहरात मंगळवारी देखील कोविड तपासणी करण्यात आली. आरोग्य विभागाच्या वतीने उंडवडी येथे घेतलेल्या तपासणीमध्ये एकही जण कोविड पॉझिटिव्ह आढळला नव्हता. मात्र बारामतीत चार तर काटेवाडी मध्ये १२ जण पॉझिटिव्ह आल्यामुळे दक्षता घेण्याची गरज वाढली आहे.
तपासणीत कोविड ‘पॉझिटीव्ह’ अहवाल मिळाल्याने काहींनी तपासणी झाल्यानंतर आपले मोबाईल बंद केले. तर काहीजण गावाकडे निघून गेले आहेत. संबधित रुग्णांना दिंडीत सहभागी करून न घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने दिंडीप्रमुखांना करण्यात आले आहे.
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी सांगितले कि, यंदा पालखी सोहळ्यामध्ये काही वारकऱ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. तसेच सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय व रुई ग्रामीण रुग्णालयात स्वॅब तपासणी सुरु आहे. लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी करावी. आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी कोणालाही गंभीर स्वरूपाची लक्षणे नाहित. मात्र, दक्षतेच्या पार्श्वभुमीवर सर्वांनी कोविडच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पुन्हा एकदा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे यांनी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये दिंडी प्रमुखांना बाबत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.