कोरोना संकटामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:11 AM2021-05-08T04:11:49+5:302021-05-08T04:11:49+5:30

वाल्हे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या निर्बंधामुळे सर्व व्यापार व व्यवसाय बंद पडले आहेत. मोठ्या शहरांतील दूध ...

Corona crisis puts dairy farmers in trouble | कोरोना संकटामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत

कोरोना संकटामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत

Next

वाल्हे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या निर्बंधामुळे सर्व व्यापार व व्यवसाय बंद पडले आहेत. मोठ्या शहरांतील दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी घटल्याने दूधदर कमी झाले आहेत. कोरोना संकटामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीने थैमान घातले असल्याने, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. वर्षभरापासून शेतीमालाला पाहिजे तितका दर मिळत नाही. त्यात दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणावे तशी परिस्थिती झाली आहे.

गतवर्षी कोरोना टाळेबंदीच्या काळात घसरलेल्या दुधाच्या दरात मध्यंतरी वाढ झाली होती.

परंतु सध्या कोरोनाच्या निर्बंधामुळे प्रतिलिटर ४ रुपयांनी दर घसरले आहेत. दूधदरात झालेल्या घसरणीमुळे पशुपालकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

ग्रामीण भागात शेतीसाठी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यासाठी जनावरांना हिरवा चारा, वैरण व खुराकाची आवश्यकता असते. भुसा व पेंडीचे दर गगनाला भिडले आहेत व दुधाचे दर मात्र कमी झाले आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे .

मागील महिन्यात गाईच्या दुधाला ३० रुपये दर दिला जात होता. कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली अन् शासनाने कडक निर्बंध लागू केले.

त्यामुळे मुंबई, पुणेसारख्या महानगरातील दुधाची मागणी घटली. तसेच ग्रामीण भागात असलेल्या लहान- मोठ्या हॉटेल व्यवसाय बंद असल्याने, याचा परिणाम म्हणून आज रोजी गाईचे दूध २४ रुपये तर म्हशीचे दूध ३५ रुपये लिटरने खरेदी केले जात आहे.

सध्या राज्यात केलेल्या संचारबंदीमुळे पशुखाद्याच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. तर दूध दरात मात्र मोठी उतराई झाली आहे. गाईच्या दुधास प्रतिलिटर ३० रुपये असलेला भाव संचारबंदीमुळे २३ ते २५ रुपये इतका झाला आहे. नाइलाजाने शेतकऱ्यांना दुधाची विक्री प्रतिलिटर पाण्याच्या बाटलीच्या किमतीत करावी लागत आहे. .

जनावरांना लागणाऱ्या खुराकाच्या वाढलेल्या किमती व चाऱ्याचा विचार केला तर शेतकऱ्यांना एक लिटर दूध उत्पादनासाठी तब्बल २५ रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र हेच दूध सध्या २३ ते २५ रुपये लिटरने विकले जात असल्याने, शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून, जनावरांच्या हिरव्या चाऱ्यांचा दूध उत्पादक शेतकरीवर्गापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील पाच- सहा महिन्यापासून ऊसतोडणी सुरू होती. मात्र साखर कारखाने बंद झाल्याने, जनावरांना हिरवा चारा म्हणून उपलब्ध होत असलेले उसाचे वाढे मिळत नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरीवर्गापुढे हिरव्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

Web Title: Corona crisis puts dairy farmers in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.