कोरोनामुळे बाजार समित्यांच्या निवडणुका सहा महिने लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:10 AM2021-04-26T04:10:12+5:302021-04-26T04:10:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात कोविड विषाणुचा प्रादुर्भाव प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळेच ...

Corona delays market committee elections by six months | कोरोनामुळे बाजार समित्यांच्या निवडणुका सहा महिने लांबणीवर

कोरोनामुळे बाजार समित्यांच्या निवडणुका सहा महिने लांबणीवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यात कोविड विषाणुचा प्रादुर्भाव प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळेच राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका पुन्हा एकदा सहा महिने पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्य शासनाने २४ एप्रिल पासून २३ ऑक्टोंबर २०२१ पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे सुमारे ३०६ पैकी २७७ बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे गेल्याने विद्यमान संचालक मंडळच कारभार पाहणार आहे.

ज्या कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका नियत झाल्या आहेत व ज्या प्रकरणी उच्च व सर्वाेच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. अशा बाजार समित्या वगळून अन्य बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

शासनाच्या २२ एप्रिलच्या आदेशाच्या दिनांकास ज्या बाजार समितीची संचालक मंडळे कार्यरत आहेत, पंरतु मुदतवाढीच्या कालावधीत ज्या संचालक मंडळाची मुदत संपणार आहे. अशा संचालक मंडळांविरुध्द अनियमिततेबाबत तक्रारी आहेत व अशा तक्रारीनुसार प्रत्यक्ष चौकशी सुरु केली आहे, अशी संचालक मंडळे वगळून इतर संचालक मंडळांना निवडणुका पुढे ढकलण्यास मुदतवाढ देण्यात येत असल्याचेही आदेशात नमूद केले आहे. तथापि, अशा संचालक मंडळांना त्यांच्या पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच्या पुढील लगतच्या दिनाकांपासून, मुदतवाढ मिळाल्याच्या दिनांकापर्यंत कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. फक्त अंतरिम व्यवस्था म्हणून काम पाहता येईल.

या आदेशाच्या दिनांकास ज्या कृषि उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक किंवा अशासकीय प्रशासक मंडळ कार्यरत आहेत. त्या प्र्शासक किंवा अशासकीय प्रशासक मंडळासही २३ ऑक्टोंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देत असल्याचेही शासनाचे उपसचिव का. गो. वळवी यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

बाजार समित्यांच्या निवडणुकीकरिता ग्रामपंचायत सदस्य आणि कृषि पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्थांमधून निवडून आलेले सदस्य हे मतदार आहेत. अशा राज्यातील बाजार क्षेत्रात काम करणाऱ्या कृषि पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणूका ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत कोविडचा संसर्ग वाढत असल्याच्या कारणास्तव पुढे ढकलल्या आहेत. त्यांच्या निवडणुका झाल्यानंतरच बाजार समित्यांच्या निवडणुका घेणे उचित होणार आहे. तसेच कोरोना साथीमुळे घोषित लॉकडाऊन प्रक्रियेत निवडणुका घेणे उचित होणार नसल्यामुळेही बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलल्याचे नमूद केले आहे.

Web Title: Corona delays market committee elections by six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.