कोरोनाने माणसांना अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:11 AM2021-04-27T04:11:09+5:302021-04-27T04:11:09+5:30

पुणे : कोरोनामुळे विद्यार्थी नसलेले विद्यापीठाचे ओसाड परिसर पाहणे क्लेशदायक वाटते. बागा आहेत पण फुले नाहीत, अशी अवस्था झाली ...

Corona forced people to think introspectively | कोरोनाने माणसांना अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडले

कोरोनाने माणसांना अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडले

Next

पुणे : कोरोनामुळे विद्यार्थी नसलेले विद्यापीठाचे ओसाड परिसर पाहणे क्लेशदायक वाटते. बागा आहेत पण फुले नाहीत, अशी अवस्था झाली आहे. विध्वंसक कोरोनाने माणसांना स्वतःविषयी अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडले आहे, असे मत सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले.

भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या २६ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात मुजुमदार बोलत होते. भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह व कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालक डॉ अस्मिता जगताप, सहकार्यवाह व. भा. म्हेत्रे, डॉ. के. डी. जाधव, डॉ. एम. एस. सगरे, कुलसचिव जी. जयकुमार उपस्थित होते.

ऑक्सफर्ड, केंब्रिज आणि हार्वर्ड या जुन्या विद्यापीठांनी मानवी इतिहासातील भयानक महासाथी पाहिल्या. तरीही ती विद्यापीठे ‘कॅम्पस विद्यापीठे’ म्हणून आजही कार्यरत आहेत. कोरोनाची लाट संपल्यानंतर सर्व काही पूर्ववत होईल, अशी आशाही या वेळी मुजुमदार यांनी व्यक्त केली.

कोरोनाच्या संकटकाळात भारती हॉस्पिटलने केलेले रुग्णसेवेचे काम कौतुकास्पद आहे, असे नमूद करून डॉ. मुजुमदार म्हणाले, शिक्षणातून ग्रामीण भागाचा चेहरा बदलणाऱ्या डॉ. पतंगराव कदम यांच्या जीवनाचा शिक्षण, राजकारण आणि समाजकारण असा समभुज त्रिकोण होता. महाराष्ट्रात खासगी महाविद्यालये होती, पण खासगी विद्यापीठे नव्हती. ती उभारण्यात डॉ. पतंगराव कदम यांचे मोठे योगदान आहे.

डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, कोरोनाच्या या संकटात संशोधनाचे महत्त्व अधोरेखित झाले असून, प्रयोगशाळेतील संशोधनाचा समाजासाठी उपयोग होणे गरजेचे आहे. संशोधनात माणसांचे प्राण वाचविण्याचे सामर्थ्य असले पाहिजे, अशा संशोधनात भारती विद्यापीठ अग्रेसर आहे.

डॉ. विश्‍वजित कदम म्हणाले, शिक्षण क्षेत्रात प्रगतीची झेप घेताना भारती विद्यापीठाने नेहमीच सामाजिक बांधिलकीला सर्वोच्च प्राधान्य दिले. कोरोनाने वर्क फ्रॉम होमबरोबरच लर्न फ्रॉम होम ही संकल्पना शिक्षणक्षेत्राला दिली. कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रासमोर निर्माण झालेल्या आव्हानांचा सर्वांनी विचारपूर्वक सामना केला पाहिजे.

डॉ. साळुंखे यांनी भारतीच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. विचार भारतीचे संपादक प्रा. मिलिंद जोशी यांनी स्वागत केले. जी. जयकुमार यांनी आभार मानले.

Web Title: Corona forced people to think introspectively

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.