जिल्ह्यात 442 गावे कोरोनामुक्त; अजूनही 100 गावे हॉटस्पॉट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:13 AM2021-08-15T04:13:15+5:302021-08-15T04:13:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भारतासह संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्या कोरोना महामारीला पुणे जिल्ह्यातील ४८ गावांनी पहिल्या आणि दुसऱ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारतासह संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्या कोरोना महामारीला पुणे जिल्ह्यातील ४८ गावांनी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देखील आपल्या गावात शिरकाव करून दिला नाही. या गावांमध्ये आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नसून, यातील बहुतेक सर्व गावे दुर्गम भागातील आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील ४४२ ग्रामपंचायती आजअखेर कोरोना मुक्त झाल्या आहेत. तर, सुमारे १०० गावांमध्ये आजही दहापेक्षा अधिक कोरोना रुग्ण असलेली हाॅटस्पाॅट गावे आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरुवातील अनेक गावांनी कडक उपाययोजना करून कोरोना महामारीला गावात येऊनच दिले नाही. पण, लाॅकडाऊन उठले आणि निर्बंध शिथिल झाल्यानंतर, शहरातील लोकांचे गावाकडे येणे-जाणे सुरू झाले आणि ग्रामीण भागातही मोठ्याप्रमाणात कोरोनाची लागण सुरू झाली. तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत, तर बहुतेक गावे कोरोनाच्या विळख्यात सापडली. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये मिळून जिल्ह्यातील १३५५ ग्रामपंचायतींमध्ये कोरोनाची बाधा झाली. तरीदेखील 48 गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने हळूहळू गावे देखील कोरोनामुक्त व्हायला सुरुवात झाली आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये आतापर्यंत २ लाख ६२ हजार कोरोनाबाधित रुग्ण आहेत, त्यातील दोन लाख ५४ हजार ७७२ रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. सद्य:स्थितीत ४ हजार १७० रुग्ण उपचार घेत आहेत.
--------
जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावे
तालुका कोरोना मुक्तगावे हाॅटस्पाॅट गावे
आंबेगाव 20 7
बारामती 0 22
भोर 76 5
दौंड 5 13
हवेली 13 4
इंदापूर 18 5
जुन्नर 120 20
खेड 74 5
मावळ 11 6
मुळशी 41 2
पुरंदर 15 5
शिरूर 12 22
वेल्हा 36 0
एकूण 442 100
--------
दररोज 11 ते 12 हजार चाचण्या
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी कोरोना चाचण्याचे प्रमाण कमी केलेले नाही. आजही ग्रामीण भागात दररोज 11 ते 12 हजार लोकांची कोरोना चाचणी केली जाते. यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून येणारे रुग्ण 250 ते 450 एवढे आहे.