५०० बस झाल्या कोरोना फ्री, प्रवासी मात्र बेफिकीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:13 AM2021-09-17T04:13:41+5:302021-09-17T04:13:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे :पुणे विभागातील ६१७ गाड्यांचे कोटिंग केले जाणार आहे. पैकी ५०० गाड्यांचे कोटिंग पूर्ण झाले. स्वारगेट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे :पुणे विभागातील ६१७ गाड्यांचे कोटिंग केले जाणार आहे. पैकी ५०० गाड्यांचे कोटिंग पूर्ण झाले. स्वारगेट व शिवाजीनगर आगाराच्या काही गाड्या गणेशोत्सवासाठी कोकणात गेल्या आहेत. कोकणातून परत आल्यानंतर त्या गाड्यांचे देखील कोटिंग पूर्ण केले जाईल. गाड्या जरी कोरोना फ्री झाल्या असल्या, तरीही प्रवासी मात्र बेफिकीर झाले आहेत. प्रवासी आता गाडीत विनामास्क प्रवास करीत आहे. ते धोकादायक ठरू शकते.
राज्य परिवहन महामंडळने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून प्रवासी गाड्यांना कोटिंग (अँटी मायक्रोबियल फवारणी) करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील सर्व विभागात याची अंमलबजावणी सुरू होऊन जवळपास ७५ टक्के गाड्यांचे कोटिंगचे काम पूर्ण झाले. पुणे विभागाचे जवळपास ८० टक्के गाड्यांचे कोटिंग पूर्ण झाले. कोटिंग केल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही. राज्य परिवहन महामंडळाने केवळ प्रवासी गाड्यांना कोटिंग करीत आहे. ते देखील सद्य:स्थितीत प्रवासी वाहतूक करीत असलेल्या गाड्यानाच कोटिंग केले जात आहे. एका गाडीला कोटिंग करण्यास जवळपास २० ते २५ मिनिटे लागतील, तर एका गाडीसाठी जवळपास १५०० रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जे. बी. कन्स्ट्रक्शन या कंपनीस याचा मक्ता देण्यात आला आहे. कोकणात गेलेल्या गाड्या परत आल्यानंतर उर्वरित गाड्यांचे कोटिंग केले होणार आहे.
बॉक्स १
वर्षातून सहा वेळा द्यावा लागणार कोटिंग :
एका कोटिंगचे आयुर्मान जवळपास दोन महिने असणार आहे. दोन महिन्यांनंतर त्याची क्षमता संपून जाईल. त्यामुळे एसटी प्रशासन दर दोन महिन्यांनी गाड्यांचे कोटिंग करेल. ही प्रक्रिया संपूर्ण वर्षभर सुरू राहील. सहा वेळा कोटिंग झाल्यावर पुन्हा गाड्यांचे कोटिंग करण्याची गरज भासणार नाही. एका वेळेस एका गाडीला कोटिंग करण्यास १५०० रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
बॉक्स २
किती बसला झाले कोटिंग :
पुणे विभागात १३ आगार आहे. यात स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी), भोर,सासवड, दौंड , इंदापूर, राजगुरूनगर आदींचा समावेश आहे. पुणे विभागाच्या जवळपास ८५० गाड्या आहेत. त्यापैकी ६१७ गाड्या प्रवासी सेवेत धावत आहे. त्यातील ५०० गाड्यांचे कोटिंग पूर्ण झाले.
बॉक्स ३
प्रवासी बेफिकीर :
गाडीला आतून आणि बाहेरून कोटिंग केले असल्याने गाडीत कोरोनाचा संसर्ग होणार नाही. मात्र, बाजूलाच जर कोरोना झालेली व्यक्ती असेल आणि सोबतचा प्रवासी विनामास्क प्रवास करीत असेल तर त्याला धोका होऊ शकतो. गाडीत आता अनेक प्रवासी विनामास्क प्रवास करताना आढळून येत आहे. प्रवशांचा हा निष्काळजीपणा जिवावर बेतू शकतो.
कोट :
पुणे विभागातील जवळपास ८० टक्के गाड्यांचे कोटिंग पूर्ण झाले. काही गाड्या आता कोकणात गेल्या आहेत. ते पुन्हा पुण्यात आल्या नंतर त्यांचे तत्काळ कोटिंग केले जाईल.
- ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी विभाग, पुणे.