कोरोनामुक्त रुग्णांनी ४ ते ८ आठवड्यांनी घ्यावी लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:10 AM2021-05-07T04:10:32+5:302021-05-07T04:10:32+5:30
डॉक्टरांचा सल्ला : ६ ते १२ आठवड्यांनी घ्यावा दुसरा डोस तज्ज्ञांची माहिती : लसीकरण सर्वांसाठीच गरजेचे लोकमत न्यूज नेटवर्क ...
डॉक्टरांचा सल्ला : ६ ते १२ आठवड्यांनी घ्यावा दुसरा डोस
तज्ज्ञांची माहिती : लसीकरण सर्वांसाठीच गरजेचे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सध्या देशात १८ वर्षे वयाच्या पुढील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झाले आहे. लस घेतल्यानंतर ७ ते १४ दिवसांनी शरीरात अँटिबॉडी (प्रतिद्रव्य) निर्माण होऊ लागतात. कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये विषाणूंशी लढण्यासाठी शरीरच नैसर्गिकरीत्या अँटिबॉडी तयार करते. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी ४ ते ८ आठवड्यानंतर लस घ्यावी, असे वैद्यकतज्ज्ञांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता कमी व्हावी आणि विषाणूविरोधात लढण्यासाठी अँटिबॉडी तयार व्हाव्यात यासाठी लसीकरण महत्त्वाचे मानले जात आहे. कोरोनामुक्त रुग्णांना लस घेण्याची गरज आहे का आणि असल्यास त्यांनी किती दिवसांनी लस घ्यावी, याबाबत सामान्यांच्या मनातील शंका दूर करण्याच्या दृष्टीने डॉक्टरांशी संवाद साधण्यात आला.
एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. मात्र त्याबाबत त्याला कल्पना नसताना लस घेतली गेली, अशीही काही उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीत लस घेतल्यावर ७ ते १४ दिवसांनी अँटिबॉडी विकसित होऊ लागतात. मात्र, त्या व्यक्तीच्या शरीरात आधीच विषाणूने प्रवेश केलेला असतो. त्यामुळे लसीचा लगेच फायदा होत नाही.
--------------
कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये नैसर्गिकरीत्या रोगप्रतिकारकशक्ती तयार झालेली असते. त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यावर २८ दिवसांनी लस घेता येऊ शकते. त्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार सहा ते बारा आठवड्यांनी लसीचा दुसरा डोस देता येतो.
- डॉ. ए.पी.एस. नरुल्ला, भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज
--------------
कोरोनामुक्त झाल्यानंतर शरीरातील रोगप्रतिकारशक्ती किती काळ टिकते आणि अँटिबॉडीपासून नेमके किती दिवस संरक्षण मिळते, याबद्दल अद्याप अभ्यास सुरू आहे. अँटिबॉडी तीन ते सहा महिने टिकतात, असा अंदाज बांधण्यात आला आहे. कोरोना संसर्ग बरा झाल्यानंतर ६ आठवड्यांनी लस घेता येऊ शकते. कोविड होऊन गेल्यावर लसींच्या दोन्ही डोसची गरज आहे का, असाही एक मतप्रवाह पुढे आला आहे. मात्र, लस घेतल्यानंतर अँटीबॉडीचे प्रमाण वाढते आणि शरीराला काही अपायही होत नाही. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांनी अवश्य लसीकरण करून घ्यावे.
- डॉ. विजय नटराजन, वैद्यकीय संचालक, सिंबायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल