कोरोनामुक्त झालेल्यांनी लस घ्यावीच, संभ्रम नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:12 AM2021-06-16T04:12:59+5:302021-06-16T04:12:59+5:30
अहवालातील सूचना अयोग्य : लस न घेतल्यास पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता पुणे : कोरोनामुक्त झालेल्यांना लस देण्याची गरज नसल्याचे ...
अहवालातील सूचना अयोग्य : लस न घेतल्यास पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता
पुणे : कोरोनामुक्त झालेल्यांना लस देण्याची गरज नसल्याचे सांगणारा अहवाल वैद्यकीय तज्ज्ञ आणि देशभरातील काही डॉक्टर संघटनांनी पंतप्रधानांना सादर केला आहे. मात्र, नवीन कोविड-१९ या विषाणूचा नवा ‘व्हेरियंट’ धोकादायक असल्याने लसीकरण अपरिहार्य असल्याचे विषाणूजन्य आजारांच्या तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनाचा संसर्ग आणि लसीकरणाबाबत दररोज नवे नियम, नवी धोरणे समोर येत आहेत. त्यातच कोरोनाची बाधा झालेल्या व त्यातून बरे झालेल्यांना लसीची आवश्यकता नसल्याचा अहवाल आला आहे. लसींचा तुटवडा पाहता वयोवृद्ध, स्थूल वा एकाहून अधिक सहव्याधींनी ग्रस्त असलेल्यांमध्ये कोरोना संसर्गानंतरच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तरुणांना लस देणे किंमतीच्या दृष्टीने परवडणारे नाही, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मात्र या दोन्ही कल्पना वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे वैद्यकतज्ज्ञांचे म्हणणे आहे. विषाणूजन्य आजारांवरील तज्ज्ञ डॉ. अमित द्रविड म्हणाले, “दुसऱ्या लाटेत अतिदक्षता विभागात दाखल करावे लागलेल्या एकूण रुग्णांपैकी ३२ टक्के रुग्ण १८-४४ या वयोगटातील होते. याच वयोगटातील ४० टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे या वयोगटाच्या लसीकरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या उलट, युरोप आणि अमेरिकेप्रमाणे भारतातही १२ ते १८ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करायला हवे.”
चौकट
अहवालाला किती महत्त्व देणार?
“कोरोनामुक्त रुग्णांना लसीकरण न करणे ही कल्पना अयोग्य आहे. अनेकांना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झाल्याची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. त्यामुळे १८ वर्षे वयोगटावरील सर्व नागरिकांचे लसीकरण झाले पाहिजे. लसींची उपलब्धता हा तांत्रिक मुद्दा आहे. ज्या तज्ज्ञांनी अहवाल तयार केला, त्यांनी कोणत्या पद्धतीने सर्वेक्षण केले, सॅम्पल साईज काय होती, कोणत्या शहरातील व्यक्तींचा अभ्यास झाला, त्यांचा अभ्यास कुठे प्रकाशित झाला आणि प्रकाशित झाला नसल्यास त्याला किती महत्व द्यायचे हे आपण ठरवले पाहिजे.”
- डॉ. सुभाष साळुंखे, कोरोना टास्क फोर्स
चौकट
पुन्हा संसर्गाची शक्यता
“कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेल्या वृद्ध व्यक्ती किंवा सहव्याधी असलेले रुग्ण यांच्यात प्रतिपिंडे (अँटीबॉडी) विकसित झाली नसल्याचे काही उदाहरणांमध्ये दिसले. काही रुग्णांमध्ये अँटिबॉडी अजिबात विकसित होत नाहीत, तर काही रुग्णांमध्ये त्या जास्तीत जास्त वर्षभर टिकतात. संसर्गाच्या तीव्रतेवर अँटिबॉडी विकसित होण्याचे प्रमाण अवलंबून असते. आपल्याकडे ८०-८५ टक्के रुग्णांना सौम्य स्वरूपाचा कोरोना होऊन गेला. त्यामुळे तिसऱ्या लाटेत पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन ‘डेल्टा व्हेरियंट’मुळे पुन्हा संसर्ग होऊ शकतो, हेही स्पष्ट झाले. त्यामुळे कोरोनामुक्त व्यक्तींना एक डोस द्यावा की दोन याबाबत दुमत असू शकते. मात्र लस देऊ नये, ही सूचना योग्य नाही. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी डेल्टा विषाणूविरोधात संरक्षण देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.”
- डॉ. अमित द्रविड, विषाणूजन्य आजारांचे तज्ज्ञ