कोरोनामुळे पुण्याला मिळाली दोन नवी रुग्णालये, आठ ऑक्सिजन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:17 AM2021-08-17T04:17:31+5:302021-08-17T04:17:31+5:30

पुणे : प्लेगच्या साथीच्या वेळी सन १९०० मध्ये स्थापन झालेल्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात तब्बल १२० वर्षांनंतर आलेला आय़सीयू ...

Corona gives Pune two new hospitals, eight oxygen projects | कोरोनामुळे पुण्याला मिळाली दोन नवी रुग्णालये, आठ ऑक्सिजन प्रकल्प

कोरोनामुळे पुण्याला मिळाली दोन नवी रुग्णालये, आठ ऑक्सिजन प्रकल्प

Next

पुणे : प्लेगच्या साथीच्या वेळी सन १९०० मध्ये स्थापन झालेल्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात तब्बल १२० वर्षांनंतर आलेला आय़सीयू वार्ड (अतिदक्षता विभाग), बाणेर येथे सहाशे खाटांची क्षमता असलेली दोन नवी रुग्णालये व आठ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प...ही कोरोना आपत्तीने पुण्याला दिलेली देण आहे.

प्लेगच्या साथीनंतर सन २००९ मध्ये आलेल्या स्वाईन फ्ल्यूच्या संसर्गजन्य आजाराच्या साथीला पुण्याला सामोरे जावे लागले़ स्वाईन फ्ल्यूची साथ अवघ्या दोन महिन्यांत अटोक्यात आल्याने, या काळात फारसा ताण आरोग्य विभागावर आला नाही़ पण, प्लेगच्या साथीनंतर कोरोना आपत्तीने जगभरातील आरोग्य यंत्रणा तत्पर होऊ लागली व यात पुणे शहरही मागे राहिले नाही.

महापालिकेच्या डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये तब्बल १२० वर्षांनंतर का होईना आय़सीयू वॉर्ड आला आहे. बाणेर येथील दोन डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलच्या उभारणीच्या निमित्ताने महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला मोठी उभारी मिळाली आहे. आय़सीयू कक्ष, व्हेंटिलेटर सुविधा, ऑक्सिजन प्लँट व सर्व सोयी सुविधांनी युक्त अशी सहा मजली प्रशस्त इमारत महापालिकेच्या आरोग्य सुविधेत कार्यरत झाली आहेत. याचबरोबर बाणेर येथील दोन हॉस्पिटल, कमला नेहरू हॉस्पिटल, लायगुडे दवाखाना, वारजे दवखाना, दळवी हॉस्पिटलसह डॉ़ नायडू हॉस्पिटल येथे महापालिकेच्या स्वत:च्या मालकीचे उभे राहिलेले ऑक्सिजन प्लँट ही शहरासाठी मोठी जमेची बाजू ठरली आहे.

एकीकडे महापालिकेची आरोग्य यंत्रणा कोरोना आपत्तीत सक्षम झाली असतानाच, दुसरीकडे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या जम्बो हॉस्पिटलमधील वैद्यकीय सोयी-सुविधा व व्हेंटिलेटरसह इतर यंत्रणाही काही प्रमाणात महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना कोराना आपत्तीनंतर मिळणार आहे. या सर्व बाबी पाहता कोरोना आपत्तीत महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने कात टाकली असून, शहराच्या आरोग्यासाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे.

Web Title: Corona gives Pune two new hospitals, eight oxygen projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.