कोरोना होऊन गेला, इतर आजारांवरील शस्त्रक्रिया करायची कधी, संभ्रम कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:09 AM2021-09-13T04:09:55+5:302021-09-13T04:09:55+5:30

पुणे : कोरोनाचा तीव्र संसर्ग होऊन गेल्यास बऱ्याच रुग्णांमध्ये पुढील तीन-सहा महिन्यांपर्यंत कोरोनापश्चात लक्षणे दिसतात. अशा परिस्थितीत एखादी तातडीची ...

Corona is gone, when to do surgery on other ailments, confusion persists | कोरोना होऊन गेला, इतर आजारांवरील शस्त्रक्रिया करायची कधी, संभ्रम कायम

कोरोना होऊन गेला, इतर आजारांवरील शस्त्रक्रिया करायची कधी, संभ्रम कायम

googlenewsNext

पुणे : कोरोनाचा तीव्र संसर्ग होऊन गेल्यास बऱ्याच रुग्णांमध्ये पुढील तीन-सहा महिन्यांपर्यंत कोरोनापश्चात लक्षणे दिसतात. अशा परिस्थितीत एखादी तातडीची शस्त्रक्रिया करायची झाल्यास रक्ताची गुठळी होण्याच्या प्रक्रियेला मज्जाव, साखरेच्या पातळीचे संतुलन, फुप्फुसांची कार्यक्षमता अशा विविध निकषांचा विचार केला जातो. नियोजित शस्त्रक्रिया किमान दोन-तीन महिने लांबणीवर टाकण्याचा पर्याय अवलंबला जाऊ शकतो. कोरोनानंतरच्या या आजारांवर शस्त्रक्रिया कधी करायच्या? त्यामुळे त्यांच्यात संभ्रम असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाच्या सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूपाच्या लक्षणांवर पोस्ट कोविड त्रास अवलंबून असतो. काही रुग्णांमध्ये ‘लाँग कोविड’ची लक्षणे दिसून येतात. यामध्ये झोपेचा पॅटर्न बदलणे, लवकर थकवा येणे, फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, हाडांचा ठिसूळपणा असे अनेक त्रास दिसून येतात. कोरोना होऊन गेल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारक क्षमताही कमी झालेली असते. त्यामुळे नियोजित शस्त्रक्रिया काही दिवसांनी करण्यावर भर दिला जातो. मात्र, पोटाची, हृदयाची तातडीची शस्त्रक्रिया किंवा प्रोसिजर, फ्रॅक्चर किंवा अपघात झाल्यास कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रिया लांबणीवर टाकणे शक्य नसते. अशा वेळी रुग्णाच्या सर्व प्रकारच्या तपासण्या करून, औषधोपचारांची दिशा ठरवून शस्त्रक्रिया केल्या जातात.

--------------------

अनेक रुग्णांमध्ये पोस्टकोविड लक्षणे बराच काळपर्यंत दिसून येतात. शस्त्रक्रियेची निकड लक्षात घेऊन त्यानुसार निर्णय घेतला जातो. एखादे हाड फ्रॅक्चर होणे, अँपेडिक्स, अँजिओप्लास्टी, पोटाची तातडीची शस्त्रक्रिया अशा इमर्जन्सी केसमध्ये वाट पाहणे शक्य नसते. गुडघ्याचे प्रत्यारोपण, गॉल ब्लॅडर, हर्निया, मोतीबिंदू अशा शस्त्रक्रिया काही काळाने करता येऊ शकतात.

- डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, आयएमए, महाराष्ट्र

----------------

कोणत्याही रुग्णाची शस्त्रक्रिया करताना त्याला कोरोना होऊन गेला आहे का, लसीचा एक किंवा दोन डोस झाले आहेत का, शस्त्रक्रिया किती तातडीची आहे या निकषांचा अभ्यास केला जातो. तातडीची शस्त्रक्रिया करताना आरटीपीसीआर चाचणी करून त्याचा अहवाल येईपर्यंत थांबणे शक्य नसते. अशा वेळी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जाते. शस्त्रक्रियेपूर्वी २डी किंवा ३डी एको, ईसीजी या चाचण्या केल्या जातात, ऑक्सिजनची पातळी, साखरेची पातळी, रक्तदाब यांची तपासणी केली जाते.

- डॉ. अच्युत जोशी, नेफ्रॉलॉजिस्ट

--------------------------

हृदयरोगाचे निदान झालेल्या रुग्णांना रक्त पातळ होण्याची किंवा रक्ताची गुठळी होण्याची प्रक्रिया थांबवण्याची गोळी नियमितपणे सुरू असते. तातडीच्या शस्त्रक्रियेच्या किमान पाच दिवस आधी गोळी बंद करावी लागते. त्याचप्रमाणे, शस्त्रक्रिया झाल्यावर रक्तस्राव थांबेपर्यंत गोळी पुन्हा सुरू करता येत नाही. अशा वेळी रक्ताची गुठळी होण्याची जोखीम वाढते. अशा वेळी शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशीपर्यंत अँटिकॉग्युलंट इंजेक्शन देता येतात. रक्तातील डी-डायमर, सीआरपी आणि केरेटिन हे मार्कर रक्त घट्ट होण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करतात. नियोजित शस्त्रक्रिया दोन-तीन महिन्यापर्यंत लांबणीवर टाकता येऊ शकतात.

- डॉ. अभिजित वैद्य, हृदयरोगतज्ज्ञ

Web Title: Corona is gone, when to do surgery on other ailments, confusion persists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.