कोरोना वाढला; मात्र राज्यात बर्ड फ्लू ओसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:12 AM2021-03-05T04:12:35+5:302021-03-05T04:12:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागला असला, तरी बर्ड फ्लूचा भर मात्र ओसरला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागला असला, तरी बर्ड फ्लूचा भर मात्र ओसरला आहे. भोपाळ येथील प्राणी, पक्षी तपासणी प्रयोगशाळेतून मृत पक्ष्यांच्या नमुन्याचे तपासणी अहवाल आता नकारार्थी येण्यास सुरूवात झाली आहे.
मागील तीन दिवसांचे अहवाल पूर्ण नकारार्थी आले आहेत. पुण्यातील प्रयोगशाळेतूनही तपासले गेलेल्या नमुन्याचे अहवाल नकारार्थीच आहेत. त्यामुळे पशुसंवधर्न विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला असला, तरीही नागरिकांनी अचानक मृत झालेल्या पक्ष्यांच्या नमुने पशुसंवर्धन विभागाकडे द्यावेत असे आवाहन केले आहे.
दरम्यान, बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नष्ट कराव्या लागणाऱ्या कोंबड्यांची संख्या १० लाख ६५ हजार झाली. एकट्या नंदूरबार जिल्ह्यातील नवापूरमध्येच २ लाख ४० हजार कोंबड्या नष्ट करून जमिनीत खोलवर पुराव्या लागल्या. उडते पक्षी तसेच पाळीव कोंबड्या यांच्या माध्यमातून पोल्ट्री मधील कोंबड्यांमध्ये हा आजार पसरत असल्याचा निष्कर्ष निघाला. त्यावर आजार आढळलेल्या ठिकाणापासून एक किलोमीटर परिघाच्या आतील सर्व कोंबड्या नष्ट करणे हाच उपाय असल्याने पशुसंवर्धन विभागाने तो काटेकोरपणे अंमलात आणला व त्यामुळे ही साथ आटोक्यात आली असे पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी सांगितले.