पूर्व हवेलीतील गावांमध्ये कोरोना वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:06 AM2021-03-30T04:06:44+5:302021-03-30T04:06:44+5:30
कोरोना दरवाज्यात आला असतानाही, नागरिक मात्र बेजबाबदारपणे वावरत असल्याचे चित्र पूर्व हवेलीत दिसून येत आहे. आरोग्य विभाग सध्या लसीकरणाच्या ...
कोरोना दरवाज्यात आला असतानाही, नागरिक मात्र बेजबाबदारपणे वावरत असल्याचे चित्र पूर्व हवेलीत दिसून येत आहे. आरोग्य विभाग सध्या लसीकरणाच्या कामात गुंतला असला, तरी ग्रामपंचायत प्रशासन व पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याशिवाय कोरोना वाढीला प्रतिबंध बसणार नाही. लोणी काळभोर, उरुळी कांचनसह पूर्व हवेलीत कोरोना मागील दहा दिवसांपासून हैदोस घालत असला, तरी नव्वद टक्क्याहून अधिक नागरिक आपण त्या गावचेच नाही अशा अविर्भावात मास्कशिवाय व सोशल न पाळता गर्दीत राजरोसपणे वावरत आहेत. उरुळी कांचन ग्रामपंचायत वगळता, पूर्व हवेलीमधील इतर ग्रामपंचायतीचे प्रशासन ढिम्मच असल्याचे चित्र दिसून येत आहे.भाजीपाला खरेदीच्या नावाखाली नागरिक ठिकठिकाणी गर्दी करत आहेत.
---------------
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर?
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन, महसूल विभाग व पोलीस यंत्रणांना वेळोवेळी कडक उपाय योजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आरोग्य विभाग सध्या कोरोनावरील लसीकरणात गुंतला असल्याने, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन कोरोनावरील उपाय योजना राबविण्याबाबत कागदोपत्री ॲक्टिव्ह असल्याचे दाखवून देत आहेत.
कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यावर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबरच पूर्व हवेलीमधील अनेक खासगी रुग्णालयात स्वॅब चाचणी करण्यात येत आहे. मात्र, स्वॅब चाचणी केल्यानंतर, तपासणी अहवाल येण्यास चोवीस ते छत्तीस तासाचा विलंब होत असल्याने, तपासणी केलेले अनेक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह असतानाही राजरोसपणे गर्दीत फिरत असल्याचे दिसून येत आहे. तर कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आसपासच्या नागरिकांना समजू नये यासाठी, अनेक पॉझिटीव्ह रुग्ण परिसरात फिरताना दिसून येत आहेत.
-------------