कोरोनामुळे ‘आरटीओ’ कामकाजाचा कोटा निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:08 AM2021-06-11T04:08:12+5:302021-06-11T04:08:12+5:30
बारामती : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या ५० टक्केपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज सुरू करण्यात आले ...
बारामती : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या ५० टक्केपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज सुरू करण्यात आले आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध कामकाजांचा कोटा निम्म्यावर आणण्यात आला आहे. शिकाऊ आणि पक्क्या परवान्याची प्रतिदिन ८० असणारी मर्यादा सध्या ४० आणण्यात आली आहे.
सोमवारपासून आरटीओ कार्यालय सुरू झाले, मात्र शासनाच्या निर्देशानुसार ५० टक्के कर्मचारी उपस्थिती असल्याने सर्व प्रकारच्या कामकाजांवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. यात वाहन परवान्यांचा कोटा ५० टक्के करण्यात आला आहे. मागील दोन ते तीन दिवसांत वाहन परवान्यांसाठी कमी प्रतिसाद मिळत आहे.
बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यांतील कारभार होतो. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यालयीन कर्मचाऱ्यांची संख्या ५० टक्केपेक्षा अधिक ठेवण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सूचनेनुसार १५ जूनपर्यंत हा बदल करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात ज्या वाहनधारकांच्या वाहन परवान्याची मुदत संपली त्यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यात शिकाऊ व कायम स्वरूपाच्या परवान्यांचा समावेश आहे. त्यामुळे ज्यांच्या वाहन परवान्याची मुदत संपली अथवा संपत आली आहे, त्यांनी अपॉइंटमेंट घेऊन आपला वाहन परवाना नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.
अधिक माहिती देताना केसकर म्हणाले, सध्या कच्चे आणि पक्के परवान्यांसाठी प्रतिदिन ४० चा कोटा ठेवण्यात आला आहे. हाच कोटा इतर दिवशी प्रतिदिन ८० असतो. कर्मचारी संख्या कमी असल्याने सध्या काही जणांना परवान्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोविडमुळे गर्दी होऊ नये याची पूर्ण दक्षता घेण्यात आली आहे. सकाळी ९ पासूनच कामकाज सुरू करण्यात येत आहे. वाहन हस्तांतरण, वाहन पासिंग, वाहन नोंदणीसह पूर्ण कामकाज सुरू करण्यात आले आहे. कर्ज़ चढविणे, कर्ज उतरविणे, प्रमाणपत्र नोंदणीकरण, कच्चा आणि पक्का परवान्याचे सर्व कामकाज सुरू आहे. येथे येणाऱ्या नागरिकांना सोशल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर बंधनकारक आहे. शिवाय कोविड १९ मुळे नागरिकांचे येथे कामासाठी येण्याचे प्रमाण कमी आहे. बुधवारी (दि. ९) २२ तर, गुरुवारी (दि. १०) २० ते २५ जण परवान्याच्या कामासाठी आले होते. १५ जूननंतर कामाची क्षमता वाढविण्यात येणार आहे. आरटीओचे कामकाज ऑनलाइन असल्याने नागरिकांनी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेऊनच यावे, असे केसकर म्हणाले. मुदत संपलेल्या शिकाऊ परवान्यासह पक्क्या परवान्याचे ‘रिशेड्युल’ करण्यात आले आहे.
सकाळी ९ पासूनच कामकाज सुरू करण्यात येत आहे. वाहन हस्तांतरण, वाहन पासिंग, वाहन नोंदणीसह पूर्ण कामकाज सुरू करण्यात आले आहे. कर्ज़ चढविणे, कर्ज उतरविणे, प्रमाणपत्र नोंदणीकरण, कच्चा आणि पक्का परवान्याचे सर्व कामकाज सुरू आहे.
तसेच शासनाने रिक्षा चालकांना १५०० रुपयांची मदत जाहीर केली होती. या कार्यालयाअंतर्गत एकूण १८२९ परवानाधारक रिक्षाचालक आहेत. त्यापैकी १००० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी निम्म्या रिक्षाचालकांच्या खात्यात १५०० रुपये जमा करण्यात आले आहे. उर्वरित १३२ अर्जांतील कायदेशीर त्रुटी पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. उर्वरित सर्वांचे देखील त्यानंतर बँक खात्यात १५०० रुपये जमा होतील, असे सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी सांगितले.
वाहनधारकांनी परिवहन, सारथी या परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाणे. परवाना सेवासंदर्भात क्लिक करणे, त्यात आवश्यक पर्याय निवडणे आवश्यक आहे. त्यानंतर अपॉइंटमेंटची पूर्तता केल्यानंतरच कार्यालयात प्रवेश करणे महत्त्वाचे आहे.